मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करावी; हिंगोलीच्या हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 05:53 PM2018-01-22T17:53:03+5:302018-01-22T17:57:17+5:30
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शेजारच्या कर्नाटकात जावून त्या राज्याचा उदो-उदो करीत आहेत. बेळगावचा सीमाप्रश्न माहिती असताना त्यांचे हे कृत्य म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेची काही देणे-घेणे नाही असेच आहे. यामुळे एकतर त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनात बोलताना केली.
हिंगोली : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शेजारच्या कर्नाटकात जावून त्या राज्याचा उदो-उदो करीत आहेत. बेळगावचा सीमाप्रश्न माहिती असताना त्यांचे हे कृत्य म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेची काही देणे-घेणे नाही असेच आहे. यामुळे एकतर त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनात बोलताना केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची हल्लाबोल यात्रा आज हिंगोली येथे आली होती. यावेळी आयोजित सभेत व्यासपीठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावर, आ. रामराव वडकुते, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुनीर पटेल, जगजित खुराणा यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजप सरकार फेकू सरकार आहे, अच्छे दिनच्या नावाखाली सरकारने केवळ शेतकरी व जनतेची लूट केली आहे. लोकशाहीत सरकारची ही हुकूमशाही कदापी खपवून घेतली जाणार नाही. भिमाकोरेगाव येथील घटना का घडली याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे असून सत्ताधार्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.
यासोबतच धनंजय मुंडेयांनीसुद्धा उपहासात्मक शैलीत केंद्र व राज्य शासनावर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होवून दिलेली आश्वासने खोटी निघाली. त्याच आईच्या चरणी डोके ठेवून हे खोटारडे सरकार उलथवून टाकण्याची शक्ती मागितली आहे. महागाई संपली पाहिजे असे सांगणार्या भाजपने १ डिसेंबर २0१७ पासून आजपर्यंत १७ रुपयांनी पेट्रोल अन् १३ रुपयांनी डिझेल वाढविले असल्याचेही ते म्हणाले.