हिंगोली: जिल्ह्यात २०१९ मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण २३९ तर २०२० मध्ये बाल मृत्यूचे प्रमाण हे २०८ एवढे होते. कोरोना काळात मातांनी काळजी घेतल्यामुळे ० ते ५ वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली
जिल्ह्यात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या काळात ० ते १ वर्ष वयोगटातील २१५ आणि १ ते ५ वयोगटातील २४ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षात ० ते १ वर्ष वयोगटातील १८५ आणि १ ते ५ वर्ष वयोगटातील २३ बालकांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात २४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून उपकेंद्र १३२ सद्यस्थितीत कार्यरत आहेत. याचबरोबर सेनगाव, वसमत आणि कळमनुरी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण व मार्गदर्शन शिबिरे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी व शुक्रवारी घेतले जातात. मातांची तसेच बाळाची योग्य ती काळजीही घेतली जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत २५ ते ३० बालके आहेत. यामध्ये ४ ऑक्सिजनवर आहेत तर १९ बेडवर आहेत. ० ते २९ दिवसापर्यंतच्या सर्व बाळांना औषधोपचार वेळेवर दिला जातो. तसेच बाळांची योग्य ती दखलही घेतली जाते. सध्या जिल्हा रुग्णालयातील बाळांची स्थिती चांगली आहे. शिशू विभागात आलेल्या मातांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात येत असून सर्व माता मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत.
बाॅक्स
कोरोना काळात माता, बालकांनी मास्कचा वापर पुरेपूर केला होता. कोरोना काळात कोणीही बाहेर पडल्याचे आढळून आले नाही. मातांनी आपल्या बालकांची पुरेपूर काळजी घेतली होती. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने माता-बालकांची काळजी घेण्यात आली. माता-बालकांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्राला सूचनाही करण्यात आल्या होत्या.
प्रतिक्रिया
गरोदर मातांनी बाल मृत्यू रोखण्यासाठी प्रथम नोंदणी करुन तपासणी करुन घ्यावी. सकस आहार घ्यावा. लसीकरणाचा लाभ घेत दोन तरी डोस घेणे आवश्यक आहेत. रक्तक्षय तपासणी वेळेवर करुन घेणे. या काळात जास्त वजन उचलू नये. हलके काम करणे. गरोदरपणामध्ये मातांनी बाळाची काळजी घेत आरोग्य विभागाचा सल्ला घ्यावा.
- डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. हिंगोली
मातांनी कोणत्याची प्रकारची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुपोषण, काही व्यंग, अपघात झाल्यास लगेच रुग्णालयात जाऊन बाळाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला वेळेच्यावेळी औषधोपचार करणेही तितकेच गरजेचे आहे.
-डॉ. गोपाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंगोली