हिंगोली: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असतानाच जिल्हा रुग्णालयात डेंग्यूसदृश आजार, मलेरिया व्हायरल, न्यूमोनिया आदी आजारांचे जवळपास ३० रुग्ण दाखल झाले आहेत. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्हा रुग्णालयातील बालरुग्ण विभागात २ ते १२ वर्ष वयोगटातील जवळपास ३० मुलांना दाखल केले आहे. या बालकांमध्ये डेंग्यूसदृश आजार व मलेरिया व्हायरल आजाराचा समावेश आहे. या सर्व दाखल रुग्णांची प्रकृती चांगली आहे. सद्य:स्थितीत हवामानात बदल झाला असून पालकांनी मुलांची काळजी घेत मुलांना उबदार कपडे घालून, रोज पाणी उकळून पाजावे, असा सल्लाही आरोग्य विभागाने दिला आहे. घराच्या आसपास पाण्याचे डबके साचलेले असतील तर ती जागा स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे.
डेंग्यू, मलेरियाची केली चाचणी...
जिल्हा रुग्णालयातील वाॅर्ड क्र. ४ मध्ये दाखल असलेल्या ३० बालकांची कोरोना चाचणीही करून घेण्यात आली आहे. दवाखान्यातील परिचारिका रोज मुलांना वेळेवर औषधोपचार करीत आहेत.
कोरोना चाचणी सुरू आहे.
सध्या बाल रुग्ण विभागात दाखल असलेल्या ३० रुग्णांची कोरोना चाचणी करणे सुरू आहे. हे दाखल रुग्ण डेंग्यूसदृश, मलेरिया व्हायरलचे असल्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. बदलत्या हवामानामुळे असे आजार उद्भवू शकतात. पालकांनी मुलांना बाहेर पडू देऊ नये, बागेत किंवा गवतावर खेळू देऊ नये. कारण गवतावर डासांचे प्रमाण जास्त असते.
ही काळजी....
सद्य:स्थितीत पावसाळी वातावरण आहे. सर्वत्र दलदल झाली आहे. मुलांना पावसात भिजू देऊ नये. पावसात भिजल्यास गरम कपड्याने मुलाचे अंग पुसावे. रोज मुलांना उकळते पाणी पाजावे. ताप, खोकला, सर्दी असल्यास लगेच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
बालरोग तज्ज्ञ काय म्हणतात...
जिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत ३० बालके डेंग्यूसदृश आजाराचे आहेत. यामध्ये दोन ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. मुलांमध्ये ताप, खोकला, सर्दी, डोके दुखणे आदींची लक्षणे आढळून आल्यास लगेच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. दीपक मोरे, बालरोग तज्ज्ञ