हिंगोली : श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरातर्फे ६८ वयोवृद्ध, विधवा, दिव्यांगांना प्रत्येकी ६ हजार ५०० रुपयांप्रमाणे साडेचार लाख रुपयांचे वाटप सहायक धर्मदाय आयुक्त रवींद्र धायतडक यांच्या हस्ते २९ जून रोजी करण्यात आले.
हिंगोलीचे सहा. धर्मदाय आयुक्त रवींद्र धायतडक यांनी सामाजिक बांधीलकी या संकल्पनेतून श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात दानपेटी ठेवावी, असे सुचविले होते. त्यानुसार संस्थानने दानपेटी ठेवली होती. यात जमा झालेल्या रकमेतून २९ जून रोजी विविध ६८ गरजूंना मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी सहायक धर्मदाय आयुक्त रवींद्र धायतडक, सेवानिवृत्त प्रा. डॉ. विलास डोईफोडे, मंदिरचे अध्यक्ष रमाकांत मिस्कीन, सचिव दिलीप बांगर, अनिल बिडकर, कृष्णमुरारी मंत्री, विश्वस्त मनोज दावणगिरी, बालाजी कामटलवार, प्रमोद जयस्वाल, शेख पाशा शेख दिवान, शैलेष नांदेडकर आदींची उपस्थिती होती. यावेळी धायतडक, दिलीप बांगर यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, यापूर्वीही सहा. धर्मदाय आयुक्त रवींद्र धायतडक यांच्या सूचनेनुसार श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी ३ लाख रुपये, कोविडसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत ५ लाख ४९ हजार रुपये, पोलीस कल्याण निधीत ५१ हजार रुपये देण्यात आले आहेत. यापुढेही गरजूंना मदत करणार असल्याचे मंदिरचे अध्यक्ष रमाकांत मिस्कीन, दिलीप बांगर यांनी सांगितले.
फोटो न. ०९