४ जानेवारी रोजी ४५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ७६१ सदस्यांच्या जागेसाठी १६२७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी १८ जानेवारी रोजी तहसील कार्यालय येथे होणार आहे. १०९ ग्रामपंचायतींमध्ये ७३ हजार ४२१ पुरुष व ६६ हजार ७८८ महिला मतदार आहेत. ९३ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी अथवा तिरंगी लढती पाहावयाला मिळणार आहेत. सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, आता उमेदवार प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
तालुक्यातील १९ मतदान केंद्रे संवेदनशील असून या मतदान केंद्रांवर पोलिसांची जादा कुमक ठेवण्यात येणार आहे. पोलिसांची करडी नजर या मतदान केंद्रांवर राहणार आहे. १०९ ग्रामपंचायतींसाठी ३५४ मतदान केंद्रे असून कर्मचाऱ्यांना २ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेबाबत पहिले प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाला १९ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या कर्मचाऱ्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात अटीतटीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. पाडापाडीचे राजकीय डाव आखण्यात येत आहेत. ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. जागोजागी कार्यकर्ते जमा होत आहेत. कार्यकर्ते सांभाळताना गावपुढाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. पैशांची उधळपट्टी आतापासून सुरू आहे. उमेदवार मतदारयाद्यांकडे लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आता उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांची हात जोडून मतांसाठी विनवणी करीत आहेत. मतदान मागण्यासाठी आलेल्या सर्वच उमेदवारांना मतदारही हो म्हणून वेळ मारून नेत आहेत. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींतील ११४ सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांनी ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी भरलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त थकबाकी वसूल झालेली आहे. राजकीय कुस्त्यांचे फड गावोगावी चांगलेच रंगलेले दिसत आहेत.