कळमनुरी : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात २० डिसेंबर रोजी कळमनुरी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला गालबोट लागून एस.टी. बस, नवीन बस स्थानक व इतर ४ ते ५ ठिकाणी दगडफेक झाली होती. या प्रकरणी १५० जणावर गुन्हे दाखल झाले असून यातील १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
शुक्रवारी २० डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राष्टीय महामार्ग १६१ वरील नवीन बस स्थानक परिसरात जमावाने चार बसवर दगडफेक करून तोडफोड केली. तसेच एक बस पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस व अग्नीशमन दलाच्या वाहनावर दगडफेक केली. यानंतर शहरात काही काळ तणाव होता. पोनि रंजीत भोईटे यांच्या फिर्यादीवरून १५० जणावर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच १९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.पुढील तपास फौजदार ज्ञानोबा मुलगीर हे करीत आहेत.
दोन बसेसवर दगडफेक प्रकरणी ४० ते ५० जणावर गुन्हे दाखल२० डिसेंबर रोजी हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर लमानदेव व भाजी मंडई जवळ दोन बसेसवर दगडफेक प्रकरणी ४० ते ५० अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया यांनी २० डिसेंबर रोजी कळमनुरीला भेट देवून परिस्तिीचा आढावा घेतला.