हिंगोली शहरातील गवळीपुरा भागातील सचिन बालगुडे हे सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभे होते. यावेळी तेथे फेरोज शेख (रा. महादेववाडी) हा आला. त्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादानंतर शेख फेरोज याने सचिन यांच्या पाठीत चाकूचा वार केला. चाकूचा वार झाल्याने त्यांच्या पाठीत खोलवर जखम झाली. तसेच चाकू तसाच पाठीत खुपसलेला होता.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, सहायक पोलीस निरीक्षक काचमांडे आदींच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी सचिन बालगुडे यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले आहे.
आराेपीच्या शोधासाठी पथके रवाना
घटना घडल्यानंतर आरोपी फेरोज शेख हा फरार झाला. त्याच्या शोधासाठी पोलीस पथके पाठविली असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली. तसेच खबरदारी म्हणून घटनास्थळी बंदोबस्त ठेवण्यात आल्याचेही ते म्हणाले.