हिंगोली : शहरातील अनेक भागांमध्ये आणि जास्त करुन मुख्य रस्त्यावर लावलेल्या होर्डिंग जाहिरातीमुळे शहर विद्रूप होत आहे. विनापरवानगी लावलेले होर्डिंग मुदत संपली तरी अजूनही तसेच उंच ठिकाणी लावलेले पहायला मिळत आहेत. विनापरवानगी जाहिराती लावणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार असा इशारा न. प. ने दिला.
शहरातील खटकाळी, नांदेड नाका, बसस्थानक परिसर, इंदिरा चौक, वाशीम रोड, महावीर चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक आदी भागात होर्डिंग जाहिराती लावलेल्या पहायला मिळत आहेत. काही होर्डिंग तर फाटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. नांदेड नाका ते गांधी चौक या मुख्य वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर, काही ठिकाणी खांबावर तसेच दर्शनी भागात जाहिराती लावलेल्या पहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी होर्डिंगचे लोखंडी पाईप वाकले असून त्यावरील कापडावर लिहिलेला मजकूरही फाटला गेला आणि पुसल्या गेला आहे. तरीही नगरपरिषदेचा संबंधित विभाग या फुकट्या जाहिराती का काढत नाही? या जाहिरातीवर का कारवाई करीत नाही? या जाहिरातींना का दंड लावत नाही? हा यक्ष प्रश्न आहे.
प्रशासन लावणार दंड
n नगरपरिषदेने या फुकट्या जाहिरातीवर कारवाई करुन त्यांना दंड ठोठावयला पाहिजे. परंतु, तसे होताना दिसून येत नाही. या फुकट्या जाहिरातीमुळे शहर विद्रूप होत चालले आहे.
n खरे पाहिले तर नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने रोजच्या रोज आपल्या कर्मचाऱ्यातर्फे शहरात सर्व्हे करायला पाहिजे. पण तसे होताना दिसून येत नाही. गेल्या महिन्यांपासून शहरात फुकट्या जाहितीचे प्रमाण वाढलेले पहायला मिळत आहे. पण प्रशासन अजूनही कारवाई करताना दिसून येत नाही.
हिंगोली शहरात लावलेल्या होर्डिंगच्या जाहिरातीपोटी वर्षभरात नगरपरिषदेला ६० ते ७० हजार रुपये उत्पन्न मिळते. सध्या शहरात चार ते पाच जाहिराती या अधिकृत असून सदर जाहिराती त्यांनी मालकीच्या जागेत लावल्या आहेत. खासगी जागेत असेल तर १ रुपया चौरस फूट असा दर दिवसाला लावला जातो तर शासकीय जागेत असेल तर दोन रुपया दिवसाला दर आकारला जातो.
शहरातील काही होर्डिंग जाहिरातीची मुदत अजून संपलेली नाही. ज्या होर्डिंग जाहिरातीची मुदत संपली आणि त्यांनी त्या जाहिराती काढल्या नसतील तर त्यांच्यावर लवकरात लवकर दंडात्मक कारवाई केली जाईल.
डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, हिंगोली
कोरोना, शैक्षणिक, कृषी, समाजोपयोगी जाहिरातींची होर्डिंग वर्षभर ठेवले तर काही हरकत नाही. पण अशा काही जाहिराती असतात की ज्यांची मुदत संपूनही त्या दर्शनी भागात लावलेल्या पहायला मिळत आहेत.
- प्रा. डी. आर. पवार,
सामाजिक कार्यकर्ता, हिंगोली