हिंगोली : गत दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नगर परिषद स्वच्छता विभागाने तीन पथकांची स्थापना केली असून, आज, सोमवारी वेगवेगळ्या भागांमध्ये हे पथक पाठविले जाणार आहे.
शनिवारनंतर रविवारीही सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस झाला. शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, बसस्थानक, तोफखाना, शास्त्रीनगर, अंबिका टॉकीज, भाजी मंडई, आरा मशीन, गाडीपुरा, पेन्शनपुरा, आदी भागांतील नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्या होत्या. नालीतील कचरा अनेक ठिकाणी रस्त्यांवर साचला होता. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाने तीन पथकांची स्थापना केली असून, हे पथक सोमवारी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन कचरा गोळा करून शहर स्वच्छ करणार आहे. या तीन पथकांमध्ये १५ कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांनी दिली.