शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतातील विविध बदल, विविध योजनांची माहिती व्हावी, यातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी शासनाचा कृषी विभाग प्रयत्नशील आहे. याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना लाभही होत आहे. ॲन्ड्राॅईड मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना हवामान बदलाची माहिती त्वरित मिळावी व होणारे नुकसान टळावे, यासाठी कृषी विभागाने किसान ॲप विकसित केले. मात्र या ॲपवर उशिरा माहिती मिळत असल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील तीन पाऊस झाला नाही. मात्र किसान ॲपवर मागील दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. २५ मे रोजीही पाऊस होणार असल्याचे सांगितले होते. परंतु, कोठेही पाऊस झाला नाही. मागील आठवड्यात येऊन गेलेल्या तौक्ते वादळाची माहितीही वेळेवर शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक होते. ही माहिती काही तासांनी मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
किसान ॲपवरून मिळते ही माहिती
१) किसान ॲपवरून हवामान, पीक पेरणी, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची माहिती मिळते.
२) कृषीसंबंधी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते
३) राज्य शासन व केंद्र शासनाच्या कृषी विभागाची माहिती एकमेकांना जोडली असल्याने योजनांची माहिती मिळते.
हे ॲप शेतकऱ्यांसाठी
शेतकऱ्यांना कृषीसंदर्भात माहिती वेळेवर मिळावी, यासाठी विविध ॲप विकसित झाले आहेत. यात कृषिक ॲप, शेतकरी मासिक ॲप, क्रॉप क्लिनिक, कृषी मित्र, किसान भारत, क्रॉप इन्शुरन्स, डिजिटल मंडी भारत, ॲग्रीमार्केट आदी ॲप शेतकऱ्यांसाठी आहेत.
अपडेट वेळेत मिळावे
-किसान ॲपवरून अद्यायावत माहिती वेळेत मिळायला हवी.
- खरीप हंगाम तोंडावर आला असून, पेरणी, बी-बियाणे, खत आदींची माहिती उपलब्ध व्हावी.
- अवकाळी पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट याची माहिती तत्काळ मिळावी.
इशारा मिळाला; पण पाऊस झाल्यावर
मागील आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. मात्र ज्यावेळी पाऊस झाला, त्यावेळी पावसाची कोणतीही शक्यता किसान ॲपने वर्तविली नाही. आता दोन दिवसांपासून पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.
- सटवा माखणे
शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान होते. वेळेवर माहिती मिळत नसल्याने आर्थिक फटका बसत आहे. किसान ॲप चांगले असले, तरी अद्ययावत माहिती वेळेवर मिळाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.
- कल्याण निर्मले