ऑनलाइन लोकमत हिंगोली, दि. 11 - शेतकरी सलग तीन वर्षापासून नेहमीच विविध संकटाना तोंड देत आहे. यंदा तर मुबलक प्रमाणात तुरीचे उत्पादन होऊनही कधी तूर विक्रीची तर कधी तुरीचे पैसे मिळविण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अजूनही २ हजारांवर शेतकऱ्यांना तूर विक्रीचा छदामही मिळाला नाही. तर बारादाना व उद्दिष्टही संपल्याने उर्वरित तुरीचे मातेरे होण्याची भीती कायम आहे. तूर खरेदीबाबत शासन वेगवेगळे आदेश काढत असल्याने, मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. केंद्र सरकारने दीड लाख टन तूर खरेदीचा आदेश काढला होता. आता तेवढे उद्दिष्टही पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. आता हिंगोलीतील बारदानाही संपल्याने तूर खरेदीला बे्रक लागला आहेत. नवीन शेतकऱ्यांचा निदान माल तरी घरी आहे. मात्र आतार्यंत या केंद्रावर तूर दिल्यावर नाफेड व खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांच्या हाती छदामही दिला नाही. ३० एप्रिल ते ८ मेपर्यंत नाफेडने खरेदी केली होती. या तुरीसह १६ ते २६ मेपर्यंत ६ हजार ८३० क्विंटल ५० किलो आणि २९ मे ते ९ जूनपर्यंत ९ हजार २२६ क्विंटल ५० किलो खरेदी विक्री संघाने तूर घेतली. मात्र या तुरीचे शेतकऱ्यांना अजूनही धनादेश दिलेले नाहीत. त्यातच कृउबाने नोंदणीचा फंडा वापरुन शेतकऱ्यांना शांत केले होते. आता उद्दिष्टही संपल्याने पुढील आदेशाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे. अधून-मधून पाऊस येत असल्याने, खरिपाच्या पेरणीसाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु पैसेच नसल्याने अडचण निर्माण झाली. आजघडीला तूर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ८ कोटी १० लाख ८७ हजार रुपयांची गरज असल्याचे खरेदी विक्री संघाच्या वतीने सांगितले. उसनवारीवर जोर : शेतकऱ्यामध्ये संभ्रम मागील वर्षी खरिपात निर्सगाने शेतकऱ्यांना साथ दिल्यामुळे तुरीचे उत्पादन चांगले झाले. परंतु तूर विकण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागता. बाहेर भाव नाही अन् हमीभावाच्या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नाही. विकलेल्या मालाचे पैसे नाहीत. त्यामुळे उसनवारी केल्याशिवाय पर्याय नाही. मध्यंतरी खरेदी विक्री संघाला नाफेड विभागाकडून १ लाख रुपये मिळाले होते. यामध्ये हमाली व इतर खर्चच पूर्ण झाला. मिळालेल्या रक्कमेतून शेतकऱ्यांना पैसेच मिळू न शकल्याने शेतकरी संभ्रामवस्थेत सापडले आहेत. आदेशाकडे लागले लक्षकृउबाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलाविले जात होते. परंतु उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पुढील आदेश येईपर्यंत तूर खरेदी बंद राहणार असल्याचे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गोेविंद भवर यांनी सांगितले.
खरेदीही बंद : बारदान्यासह उद्दिष्ट संपले, तूर उत्पादकांना पैशांची चिंता
By admin | Published: June 11, 2017 7:12 PM