हिंगोली : जिल्हा पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचा कोणताही वचक राहिला नसल्याने जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी स्वतःहून बदलीचा अर्ज करून आमचा जिल्हा नासवला जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दांत आमदार तानाजी मुटकुळे यांनी प्रशासनाला सुनावले.
जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून, हे अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनातच उपोषण सुरू केले आहे. मागच्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. परंतु कोणताही अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. सदरील अवैधंदे बंद करण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा सांगण्यात आले. परंतु त्याकडेही कानाडोळा केला गेला. त्यामुळे तर आज उपोषण करण्याची वेळ येत आहे. वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली नसल्यामुळे मी आजपासून जिल्हाधिकारी यांच्या दालनातच उपोषण करत आहे, असे आमदार मुटकुळे म्हणाले.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात किती वाहने तपासणी व किती पकडली हेही, प्रशासनाला सांगता आले नाही. आरटीओंनी त्यांच्याकडे वाळू वाहतुकीसाठी किती वाहनांची नोंद झाली याची माहिती दिली नाही. तसेच विनाक्रमांक वाहने वाळूसाठी वापरली जात असताना का कारवाई होत नाही, असेही मुटकुळे यांनी विचारले. आरटीओंना काही सांगता आले नसल्याने आरटीओ अनंत जोशी यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठवा असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले. महिनाभरापासून मी वारंवार तक्रार करीत असताना प्रशासनाने काहीच कारवाई केली नसल्याने या अवैध धंद्यांना त्यांचा पूर्ण वरदहस्त असून ते व्यवसाय करणाऱ्यांशी मिळाले आहेत, असा आरोप मुटकुळे यांनी केला.
मटका, वाळू, गुटखा, रेती बिनधास्त सुरू असल्याचे ते म्हणाले. हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी धरलेले टिप्पर सोडल्याने त्यांच्यावर कारवाई म्हणून आजच्या आज कार्यमुक्त करा, असेही ते म्हणाले. तर हे टिप्पर पकडून त्या टिप्परमालकार मोक्का लावण्याची मागणीही केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, कैलास काबरा, पप्पू चव्हाण, विजय धाकतोडे, संतोष टेकाळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.