राज्यात १५ जुलैपासून कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी पालकांशी चर्च करून ठराव घ्यायचा आहे. यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमली आहे. यात तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख हे सदस्य, तर ग्रामसेवक सचिव राहणार आहेत.
याशिवाय जुने बरेच नियम कायम ठेवले. ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहीम राबविण्यास सांगितले. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा, तापमापक, जंतुनाशक, साबण, पाणी यांची व्यवस्था करण्यासही सांगितले. शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून त्याचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीला पडताळणी करण्यास सांगितले. सामाजिक अंतर, बाकांतील अंतर, मास्कचा वापर, रांगेत सहा फुटांचे अंतर, गर्दीचे कार्यक्रम न घेणे अशा सूचना कायम आहेत, तर पालकांची संमती आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मात्र उपस्थितीचे बंधन नाही. ती पालकांवर अवलंबून आहे.
या बाबींवर करावा विचार
शाळा सुरू करण्यापूर्वी किमान एक महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळून आलेला नसावा, शिक्षकांचे लसीकरण करण्याचे नियोजन प्राधान्याने जिल्हाधिकाऱ्यांनी करावे, याबाबत मुकाअ व शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळा परिसरात प्रवेश देऊ नये, विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करावे, विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे, वैद्यकीय उपचार सुरू करावेत, शाळेत टप्प्याटप्प्याने मुलांना बोलवावे, या बाबींवर विचार करण्यास सांगण्यात आले आहे.