हिंगोली : मातंग समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केले. हिंगोली येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे वाचनालयासमोर रविवारी दुपारी मातंग समाज आरक्षण व एकता क्रांती महामेळावा आयोजित केला होता.साठे पुढे म्हणाले की, मातंग समाजाच्या विकासासाठी अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण होणे काळाजी गरज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समाजाकडून आरक्षण वर्गीकरणाची मागणी होत आहे; परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. आरक्षणाशिवाय समाजाचा विकास होवू शकत नाही. आज प्रत्येक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे. मातंग समाजाने आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे असे त्यांनी सांगितले.संभाजीराव मंडगीकर म्हणाले की, समाज विकासाकडे वाटचाल करत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे हे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहा. माजी नगराध्यक्ष बबन शिखरे यांनी मेळाव्यात मातंग समाजाच्या विकासासाठी अनेक ठराव वाचून दाखविले. अनु.जातीसाठी राखीव असलेल्या आरक्षणाचे अ, ब, क,ड वर्गवारी झाले पाहिजे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास १ हजार कोटींची तरतूद करावी असे ११ ठराव त्यांनी वाचून दाखविले. महामेळाव्यात अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई साठे, हुतात्मा पोचीराम कांबळे यांच्या पत्नी धोंडाबाई कांबळे यांचा सत्कार झाला. समितीचे अध्यक्ष भागवत डोंगरे, प्रदीप खंदारे, मीराताई गायकवाड, गणेश भगत, अनिल सरोदे, चंद्रकांत कांबळे, राधाकृष्ण साठे, डॉ.संजय लोखंडे, सुनीलभाऊ सौदागर, संजयभाऊ इंचे, संजूबाबा गायकवाड, विनोद वैरागड, शिवराज जाधव, विश्वनाथ गवारे, चंद्रकांत कारके, गजानन खंदारे, प्रल्हाद दगड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. नगरसेवक रविकिरण वाघमारे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहिले.
विकासासाठी समाजाने एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:05 AM