लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ‘मैत्रेय’ समुहात गुंतवणूक केलेले अनेकजण हिंगोली येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल करीत आहेत. मागील सहा दिवसांपासून गुंतवणूकदार हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दी करीत आहेत. मैत्रेय पाठोपाठ आता शुभकल्याण मल्टिस्टेट को-आॅफ क्रेडीट सोसायटीत गुंतवणूकदारांनीही पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले आहे.जिल्ह्यातील अनेक लोकांनी मैत्रेय या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. परंतु त्यांना मैत्रेयने पैसे परत केलेच नाहीत. त्यामुळे हे गुंतवणूकदार आता पैसे परत मिळविण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल करीत आहेत. विशेष म्हणजे तक्रारकर्त्यांची गर्दी दिवसेंददिवस वाढतच चालली आहे. तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्यांकडून रितसर आवश्यक कागदपत्रे घेतली जात आहेत.२१ डिसेंबर रोजी शुभकल्याण मल्टीस्टेट को-आॅप क्रेडिट सोसायटीमधील गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले आहे. सोसायटीमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करणारे राजेश कन्हैयालाल जैस्वाल यांनी शेकडो लोकांचे व स्वत:ही गुंतवणूक केली. परंतु मागील दीड वर्षांपासून शाखा बंद आहे. चौकशी करूनही मुख्य कार्यालयातून मदत मिळत नसल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन सादर केले आहे. निवेदनावर ६१ गुंतवणूकदारांच्या स्वाक्षºया आहेत.‘मैत्रेय’ समुहाच्या विविध वित्तीय अस्थापनांमार्फत ठेवीदारांच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी राज्यात एकूण ३0 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यांच्या तपास व कार्यवाहीमध्ये समन्वयासाठी संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून निष्पन्न झालेल्या मालमत्ता जप्ती करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यांची कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून उर्वरित मालमत्ता जप्तीबाबतचीही कार्यवाही सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही सक्षम अधिकाºयांमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गुंतवणूकदारांच्या तक्रारी एकत्रितचे काम केली जात आहेत.
मैत्रेयपाठोपाठ शुभकल्याणच्याही तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:17 AM