हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे घरासमोरून ट्रॅक्टर चोरीला गेल्याची फिर्याद ३१ ऑक्टोबर रोजी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिस तपासात या प्रकरणातील फिर्यादीच आरोपी असल्याचे समोर आले असून, ३ नोव्हेंबर रोजी दोघांना ताब्यात घेण्यात आले.
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथील नितीन गौतम इंगोले (वय ३३) याने २९ ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.३५ एक्यू १६२४) चोरीस गेल्याची फिर्याद आखाडा बाळापूर ३१ ऑक्टोबर रोजी दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी विशेष पथक नेमून याचा तपास केला. यात फिर्यादीच संशयाच्या भोवऱ्यात येत असल्याचे दिसून येताच पोलिसांनी नितीन इंगोले याची अधिक विचारपूस केली. परंतु, त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता फिर्यादीचा मित्र शेख अनिस शेख गणी (वय ४०, रा.तोफखाना, हिंगोली) याच्या मार्फत ट्रॅक्टर चोरी करण्यास सांगितल्याचे कबूल केले.
पोलिसांनी नितीन इंगोले व शेख अनिस शेख गणी या दोघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ट्रॅक्टर हेडसह ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे, दत्ता नागरे यांच्या पथकाने केली.
फायनान्सचे कर्ज बुडविण्यासाठी केला चोरीचा बनाव...नितीन इंगोले याने एका फायनान्सचे कर्ज उचलून ट्रॅक्टर घेतले. त्या फायनान्सचे कर्ज बुडविण्यासाठी तसेच भरलेले डाऊन पेमेंट परत मिळविण्यासाठी ट्रॅक्टर चोरीचा बनाव करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले.