विजय पाटील
हिंगोली : मी आयएएस झालेला आहे. सध्या परीविक्षाधीन काळात आहे. अतिरिक्त जिल्हा पदावर आहे, असे सांगून हिंगोलीतील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा मुख्य अतिथी बनलेल्या तोतयाविरुद्ध १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अमोल वासुदेव पजई (वय ३२) हा हिंगोलीत दाखल झाला. त्याने अनंता मधुकर कलोरे (वय ४२, रा. मोठी उमरी, ता. जि. अकोला) व संदीप ऊर्फ इंद्रजित एकनाथ पाचमाशे (वय ३४, रा. सुराणानगर, हिंगोली) यांच्या मदतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असल्याचे भासवून पोदार शाळेत दोन मुलांचे अॅडमिशनही करून घेतले. तर मुलांच्या फॉर्ममध्येही हे पद नमूद केले. या पदावर असल्याने पोदार शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास हजेरी लावली. शाळेने पत्रिकेत अगदी पहिलेच नाव छापून त्यांना प्रमुख पाहुणा केले. यामुळे शाळेची फसवणूक केल्याचे प्राचार्य विनय उपाध्याय यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले.
पोलिस अधीक्षकांच्या सतर्कतेने प्रकार उघड
हा प्रकार आधी शाळेच्या लक्षात आला नव्हता. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज अमोल हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना भेटला. मी पण आयएएस अधिकारी असल्याची त्यांनाही बतावणी केली. २०२० च्या बॅचचा असल्याचे सांगितले. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी असून हिंगोलीत बदलीवर येणार असल्याचे सांगितले. यामुळे जी श्रीधर यांना शंका आल्याने त्यांनी ती यादी तपासली. दिलेला कोड चेक केला तर तो झारखंडमधील अधिकाऱ्याचा निघाला. त्यामुळे त्यांनी स्थागुशाचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांना संबंधिताचा मोबाइल क्रमांक देऊन यात तपासणी करण्यास सांगितले.
गाडीतील कागदपत्रांनी फुटले बिंग
अमोलकडे महागडी चारचाकी आहे. तिची तपासणी केली असता त्यात हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेटर पॅड, एनटीसीतील अर्बन बँकेची कागदपत्रे, भाडे करायचे बाँड,पत्नीचे ओळखपत्रही आढळले. या ओळखपत्रावर गृह मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडियन मिनीस्ट्री ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट, तसेच नाव व फॉरेस्ट रेंज ऑफिसर अशी संशयित कागदपत्रे आढळली. इतरही परीक्षेसंबंधी कागदपत्रे आढळल्याचे सांगितले जाते.
तब्बल पाच लाखांची रोकड
या गाडीत तब्बल पाच लाखांची रोकडही आढळली आहे. पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली आहे. ती कशासाठी सोबत होती? हे तपासात पुढे येईल. मात्र अमोलच्या पत्नीलाही पोलिसांनी चौकशीस बोलावले होते. तिने मी कोणतीच अधिकारी नसून मला ओळखपत्राबद्दल माहिती नसल्याचे सांगितले.
तिघांनाही घेतले ताब्यात
यातील अमोल पजई, आनंता कलोरे व संदीप पाचमाशे या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात असतानाही अमोल मात्र मला उद्या दुपारपर्यंतची वेळ द्या, मी माझी उपजिल्हाधिकारी पदाची प्राबेश्नरीची ऑर्डर दाखवितो, असे सांगत असल्याचे दिसून येत होते. मात्र तोपर्यंत फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.