लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : दुष्काळात ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी कळमनुरी तहसीलतर्फे प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अधिग्रहणाचे बोगस प्रस्ताव मान्य होऊ नयेत यासाठी पथकाकडून ‘आॅन द स्पॉट’ पाहणी करून खात्री पटताच अधिग्रहणाचे पत्र तात्काळ हातात दिले जात आहे. तालुक्यात आतापर्यंत ४२ गावांमध्ये ४८ विहिरी व बोअर अधिग्रहित केले आहेत. तर आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे.कळमनुरी तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. कायम दक्ष राहात पाणीटंचाईवर मात करण्याची नवी पद्धती त्यांनी अवलंबिली आहे. आतापर्यंत विहीर अथवा बोअर अधिग्रहित करताना दोन-दोन वर्षांपासूनचे अधिग्रहणाचे पत्रच शेतकऱ्यांना प्राप्त झाले नाही. काही ठिकाणी दिवस वाढवून दाखवून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रमही झाला. परंतु यावर मात करत कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी पाणीटंचाईबाबत प्रशासनाला अलर्ट करत नव्याने कार्यपद्धती अवलंबिली आहे. पंचायत समितीकडून प्रस्ताव प्राप्त होताच दोन ते तीन दिवसांच्या आत पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यासह महसूलचे पथक संबंधित गावात भेट देणार, प्रत्यक्ष पाहणी करणार आणि खात्री पटताच आॅन दी स्पॉट तेथेच अधिग्रहणाचे पत्र देण्यात येत आहे. आतापर्यंत कळमनुरी तालुक्यातील ४२ गावांमधील ४८ विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यांचे पत्रही त्याच ठिकाणी त्यांना देण्यात आले आहे. तालुक्यात आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकंदरीत पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या वेगळ्या कार्यशैलीमुळे शासकीय निधीच्या गळतीला थांबविण्यातही प्रशासनाला यश मिळाले आहे. जनतेला टंचाईवर तातडीने उपाययोजना होत असल्याने समाधान मिळत आहे. एकंदरीत तालुका प्रशासनाची जागेवरच अधिग्रहणाचे पत्र देण्याची पद्धत मात्र तालुक्यात चचेर्चा विषय ठरली आहे.टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असलेली गावे -कुपटी, महालिंगी तांडा, हातमाली, सिंदगी, पोत्रा, शिवणी खुर्द ,खापरखेडा, माळधावंडा.अधिग्रहणग्रस्त गावेकुपटी, रेणापूर ,कसबे धावंडा, कृष्णापूर, कोंढूर, टाकळी डि., कवडा, गोलेगाव, बिबथर, सालेगाव, वाई, गोटेवाडी, निमटोक, दाभडी, रामवाडी, शिवणी, पोत्रा, सिंदगी, कामठा, असोला, नवखा, बेलथर, सांडस त.ना, सालेगाव, म्हैसगव्हान, बोल्डावाडी, निमटोक, तेलंगवाडी, रुद्रवाडी, कसबेधावंडा, जांब, भुरक्याची वाडी, काळ्याची वाडी, पावनमारी, भोसी, बेलमंडळ, गौळ बाजार, हारवाडी, कळमकोंडा, खरवड, डिग्री आदी गावांत जलस्त्रोत अधिग्रहण केले.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व नागरिकांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू नये यासाठी प्रशासन दक्ष आहे. पंचायत समितीकडून प्रस्ताव प्राप्त होताच दोन दिवसांत घटनास्थळी भेट देऊन महसूल प्रशासन टंचाईवर उपाययोजना करून प्रत्येक्षात उपाययोजना कार्यान्वित करत आहे. त्यामुळे जेथे दुष्काळ जाणवतो. त्यांनी थेट पं. स. अथवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा, तातडीने अंमलबजावणी केली जाईल.- तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे
खात्री पटताच गावातच दिले अधिग्रहणाचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:37 PM