हिंगोली : जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव ( Pradnya Satav ) यांची आज विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे (BJP ) उमेदवार संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडीने हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचे हात बळकट होण्यास मदत होणार आहे.
हिंगोली जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यासारखी स्थिती होती. जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वरचष्मा होता. त्यानंतर एक खासदार व एक आमदार व काही स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताबा होता. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यानंतर राजीव सातव यांना राज्यसभेवर संधी देत जिल्ह्यात काँग्रेसला बळ देण्याचा पक्षाने प्रयत्न केला होता. मात्र राजीव सातव यांच्या निधनाने जिल्ह्यात नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात असली तरीही कुणी खासदार, आमदार अथवा महामंडळावरही नसल्याने पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडेच प्रत्येक कामासाठी जाण्याची वेळ कार्यकर्त्यांवर येत होती. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आता प्रज्ञा सातव यांच्या विधान परिषदेवरील निवडीने पुन्हा नवा हुरुप आल्याचे पहायला मिळत आहे.
काँग्रेसची होत असलेली बिकट अवस्था, गटतट यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात होते. नेमकी काय भूमिका घ्यायची? याचाही अनेकांना अंदाज येत नव्हता. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगरपालिका, जि.प. व पं.स.च्या निवडणुका आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांना आधार वाटेल, अशी स्थिती जिल्ह्यात नव्हती. त्यामुळे अनेक जण इतर पक्षांच्या संपर्कातही होते. आता ही मंडळी पुन्हा पक्षातच पाय रोवून उभे राहण्याची तयारी करू लागली आहे. पक्षाने प्रज्ञा सातव यांची निवड केल्याने या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनाही आता पूर्ण वाव आहे.
पक्ष संघटन बळकट करण्याचा प्रयत्नयाबद्दल प्रतिक्रिया देताना प्रज्ञाताई सातव म्हणाल्या की, पक्षनेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वर्षाताई गायकवाड, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व इतर पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वासाने ही जबाबदारी टाकली. येणाऱ्या काळात ती सार्थ ठरविण्यासाठी काम करणार आहे. काँग्रेसची विचारधारा सामान्यांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन बळकट करण्याचा प्रयत्न राहील.