हिंगोली :काँग्रेसच्या सातव व गोरेगावकर गटातील वादाचा फटका पक्षनिरीक्षक बाळासाहेब देशमुख यांना बसला. भेदभाव करीत असल्याचा आरोप करीत रविवारी दुपारी ३ च्या सुमारास जिल्हा कार्यालयातील बैठकीतून त्यांना हाकलून देत धक्काबुक्कीचा प्रकारही घडला.
हिंगोली जिल्ह्यात आता आ. प्रज्ञा सातव व माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे दोन गट झाले आहेत. मध्यंतरी या दोन गटांतील अंतर कमी झाल्याचे जाणवत असतानाच आज घडलेल्या प्रकारानंतर ही दरी कायम असल्याचे समोर आले आहे. पक्षनिरीक्षक देशमुख यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या बैठकीला हजेरी लावण्यापूर्वी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. त्यानंतर तेथेच बैठक घेतली. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी सर्वांना आवाहन केले. तेव्हा गोरेगावकर यांचे अनेक समर्थक बैठकीस हजर झाले. दरम्यान, काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात माजी आ. संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, कार्याध्यक्ष मुनीर पटेल आदींच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. या ठिकाणी सगळे जण पक्षनिरीक्षक देशमुख यांची वाट पाहत होते. मात्र संपर्क साधूनही ते येत नसल्याने आधीच संताप होता. ते लवाजम्यासह आल्यावर जिल्हाध्यक्षांचे भाषण सुरू असताना आवाज कमी असल्यावरून राडा सुरू झाला. दोन्ही गट बाजूलाच राहिले. पक्ष निरीक्षकांनीच हा वाद घडवून आणल्याचा आरोप करीत कार्यकर्ते त्यांच्या अंगावर गेले. देशमुख यांना काही जणांनी धक्काबुक्कीही केली. त्यानंतर काही जणांनी देशमुख यांना तेथून बाहेर नेण्यास मदत केली. या प्रकारामुळे काँग्रेसमधील वादाला पुन्हा एकदा फोडणी बसल्याचे चित्र आहे. याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बाळासाहेब देशमुख यांचा भ्रमणध्वनी स्वीच ऑफ होता.
याबाबत जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे म्हणाले, पक्षनिरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी पक्ष कार्यालयात बैठकीला न येता दोन तास ताटकळत ठेवले. माजी आ. गोरेगावकर यांच्या घरी गेले. तेथून काही कार्यकर्त्यांना आणले. यावरून वाद उफाळला. कार्यकर्ते संतप्त झाले. मात्र देशमुख यांच्या अंगावर कार्यकर्ते जात असल्याने त्यांना सुखरूप तेथून बाहेर आणून सोडले. धक्काबुक्की कोणी केली नाही.
याबाबत माजी आ. भाऊराव गोरेगावकर म्हणाले, मला पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते. तसे मी पक्षनिरीक्षक देशमुख यांना सांगितले. त्यामुळे ते माझ्या घरी आले. पक्षाच्या बैठकीस येण्याचा आग्रह करीत होते. मी गेलो नाही. मात्र कार्यकर्त्यांना त्यांनी आग्रह केल्याने काही जण गेले होते.