काँग्रेसकडून तीन जिल्हा परिषद सदस्यांचा अपात्रतेचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:14 PM2020-02-06T13:14:05+5:302020-02-06T13:18:08+5:30
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या वेळी काँग्रेसमध्ये गटा-तटांप्रमाणेच फूट पडली होती.
हिंगोली : जिल्हा परिषदेत रोज नव्या वादांना तोंड फुटू लागले आहे. दोनच दिवसांपूर्वी विषय समित्यांचे खातेवाटप करण्याच्या सभेत झालेल्या गोंधळानंतर आता काँग्रेसच्या वतीने माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर गटाच्या तीन सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हा कचेरीत दाखल केला आहे. यावर अजून पुढील प्रक्रियेला प्रारंभ झाला नसला तरीही ही बाब आता चर्चेचा विषय ठरत आहे.
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या वेळी काँग्रेसमध्ये गटा-तटांप्रमाणेच फूट पडली होती. माजी खा.राजीव सातव यांचा सात जणांचा गट वेगळा तर माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा तीन जणांचा गट वेगळा राहिला. यात सातव गटाच्या मंडळीला बाजूला सारून शिवसेनेने गोरेगावकर गटाला एक सभापतीपद देत सर्व बाबी आपल्या मनासारख्या करून घेण्यात यश मिळविले आहे. गोरेगावकर गटाचे बाजीराव जुंबडे यांना सभापतीपद मिळाले आहे. आता जुंबडे यांनी शिक्षण पदावर दावा केला असला तरीही तेथे काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेतील असंतुष्टांनी राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण यांच्या पाठीशी बळ उभे केले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सभा तहकूब करावी लागली होती. त्यामुळे माजी खा.सातव यांच्या गटाचा विरोध स्पष्ट दिसत होता.
आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या सूचनेवरून सभापती बाजीराव जुंबडे, माजी सभापती संजय देशमुख व चंद्रभागा देवराव जाधव या तीन सदस्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नसल्याच्या कारणावरून त्यांना अपात्र घोषित करण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला आहे.या प्रस्तावावर आता पुढील कारवाई काय होईल ते सुनावनीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी महसूल क्रीडा स्पर्धांमुळे हे प्रकरण लवकर सुनावणीला येईल, अशी शक्यताही दिसत नाही. मात्र या प्रकाराची चर्चा तेवढी रंगणार असल्याचे दिसते.
जिल्हा परिषदेत एकच चर्चा
जिल्हा परिषदेतील वितंडवाद सुरू असले तरीही त्यावरील चर्चाही मात्र तेवढीच सामंजस्याने होते. सभागृहात एकमेकांना विरोध करणारी मंडळी सभागृहाबाहेरील चर्चेत मात्र तेवढीच खिलाडीवृत्ती ठेवून व दिलखुलासपणे चर्चेत सहभागी होताना दिसते.४मागील दोन दिवसांपासून जि.प.तील तिढा कसा सुटणार व कोण सोडविणार, यावरुन चर्चा रंगत आहे. मात्र तोपर्यंत बिनखात्याचे सभापती अन् वादाला फोडणी देणारी बाहेरची मंडळी सर्वांचीच अस्वस्थता वाढवून जात असल्याचे दिसत आहे.