हिंगोली जिल्हा परिषदेत काँग्रेस-सेनेच्या कार्यकर्त्यांत राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 06:57 PM2018-11-13T18:57:11+5:302018-11-13T18:59:15+5:30

दोन्ही गटांचे नेते आधी जि.प.त व नंतर पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्याने एकच चर्चेचा विषय बनला होता.

Congress-Sena members dispute in Hingoli Zilla Parishad | हिंगोली जिल्हा परिषदेत काँग्रेस-सेनेच्या कार्यकर्त्यांत राडा

हिंगोली जिल्हा परिषदेत काँग्रेस-सेनेच्या कार्यकर्त्यांत राडा

Next

हिंगोली : निविदा भरण्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत राडा झाल्याने आज दिवसभर राजकीय धुमश्चक्रीचे वातावरण होते. दोन्ही गटांचे नेते आधी जि.प.त व नंतर पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्याने एकच चर्चेचा विषय बनला होता.

शेवाळा जि.प. सर्कलमधील शेवाळा येथील ४0 लाखांच्या पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाच्या निविदेवरून हा वाद झाला. काँग्रेसचे आ.संतोष टारफे यांचे स्वीय सहायक श्रीनिवास नितनवरे हे निविदेसाठी लागणारा डीडी बांधकाम विभागात देण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत गेले होते. तेथे गावातील वादाला तोंड फुटले. यावरून नितनवरे यांना मारहाण झाल्याने प्रकरण पेटले. यात ते जखमी झाले आहेत.  

या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल हे सहकाऱ्यांसह दाखल झाल्याने जमाव पांगला. त्यानंतर काँग्रेसचे आ.संतोष टारफे यांनी स्वत: कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह आधी जि.प. गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांच्या दालनात ठाण मांडले. मात्र ते दौऱ्यावर होते. आ. टारफे यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते, अ‍ॅड. गयबाराव नाईक, केशव नाईक, विनायकराव देशमुख, सुरेश सराफ, विलास गोरे आदी त्यांच्यासमवेत होते. 

याबाबत प्रशासनाकडूनच तक्रार दाखल करण्याची मागणी केली. तर काही वेळानंतर जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या दालनात सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, उद्धवराव गायकवाड, भानुदास जाधव, रामेश्वर शिंदे, बाळासाहेब मगर व इतर जमले. आ.टारफे हे पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले. तेथे तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर जि.प.अध्यक्षा नरवाडे या शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यांनीही तक्रार दिली. 

मुळात शेवाळा गटात उपसभापती अजय सावंत व सरपंच अभय सावंत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने हा प्रकार घडला आहे. त्याला आता राजकीय वळण मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी अजय सावंत यांनी काँग्रेसच्या पं.स. सदस्यांशी संगणमत करून उपसभापतीपदही पटकावले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील युती धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. हे प्रकरण शांत होत नाही, तोच हा प्रकार घडल्याने कधी नव्हे, काँग्रेसजण आक्रमक दिसून येत होते. त्यामुळे जि.प.तील युतीलाही धोका उद्भवल्यास नवल नाही. 

तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू
याबाबत जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे या शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ठाण मांडून होत्या. तर आ.संतोष टारफे यांचे स्वीय सहायक श्रीनिवास नितनवरे यांची तक्रार घेण्यासाठीही फौजदार गेल्याचे ठाण्यातून सांगण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.

Web Title: Congress-Sena members dispute in Hingoli Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.