हिंगोली : जि. प. लघुसिंचनच्या कामांची दरवर्षीप्रमाणेच यंदाही बोंब कायम आहे. वसमत तालुक्यातील आडगाव येथे दोन सिमेंट नाला बांधाची कामे निविदेपूर्वीच तयार असल्याचे चौकशीत समोर आले. ही कामे रद्द करण्यात येणार असल्याचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार यांनी सांगितले.
हिंगोली जि. प.च्या लघुसिंचन विभागाच्या मनमानीमुळे पदाधिकाऱ्यांनी अनेकदा या विभागावर ताशेरे ओढले. मागच्या वर्षीही या विभागाकडून दिलेली कामे वेळेत करण्याऐवजी ती प्रलंबित ठेवण्याचा घाट घातला जात असल्याने पदाधिकऱ्यांनी चांगलेच फटकारले होते. शिवाय जि. प.ला एकमेव याच विभागाला कार्यकारी अभियंता असतानाही त्यांना इतर विभागाचा पदभार यामुळेच देण्याचे टाळले जात होते. एव्हाना त्यांचा पाणीपुरवठ्याचा पदभार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर यंदाही याच विभागाने दिलेल्या पाठबळामुळे वसमत तालुक्यातील आडगाव येथे दोन बंधाऱ्यांची कामे निविदा उघडण्याच्या दिवशी तयार असताना त्याची निविदाप्रक्रिया झाल्याचे समोर आले. एकतर लघुसिंचन विभागाशी मिलीभगत करून संबंधित कंत्राटदाराने ही कामे आपल्यालाच मिळणार हे ग्राह्य धरले असावे. अथवा लघुसिंचनमध्येच गुत्तेदारी फोफावल्याची शक्यता नाकारता येत नाही. या विभागाला प्रशासन मात्र पाठीशी घालत आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार म्हणाले, ही निविदा उघडताच याबाबतची तक्रार आल्याने चौकशी केली. जिल्हा जलसंधारण अधिकारी जि. प. लपा यांच्याकडे ही चौकशी होती. त्यांनी या दोन्ही बंधाऱ्यांची कामे प्रगतिपथावर असून पिचिंगचे काम व विंगवॉलच्या बाजूच्या माती भरावाचे काम आणि कामाचे फलक लावणेच बाकी असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे निविदेनंतर लागलीच एवढे काम होणे शक्य नसल्याने ते रद्द करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे ज्या विभागाचे काम त्याच विभागाकडे चौकशी देण्यातच गौडबंगाल आहे. सिमेंट बांधात किती पाणी मुरेल हे सांगता येत नाही, मात्र लघुसिंचनमध्ये चाललेल्या या ‘अर्थ’पूर्ण कारभारामागे कुठेतरी पाणी मुरतेय, असा आरोप माजी शिक्षण सभापती संजय देशमुख यांनी केला आहे.
लघुसिंचनच्या कारभाराची चौकशी होणार?
मागील अनेक दिवसांपासून वारंवार चर्चेच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या व कायम तक्रारी असलेल्या लघुसिंचन विभागाची प्रशासन खरेच चौकशी करेल काय? निविदा निघाल्यावर कामे केली जात नाहीत. मग आधीच कामे पूर्ण होत असतील या विभागाचे काही साटेलोटे असल्याशिवाय हे शक्य नाही. यावर कारवाई होईल का? हा खरा प्रश्न आहे.
जि. प. बांधकाममध्येही आडवाआडवी
जि. प.च्या बांधकाम विभागातही गुत्तेदारांची देयके पडून राहत आहेत. या विभागाला प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून लवेश तांबे हे आहेत. वर्षानुवर्षे येथेच ठाण मांडून बसलेले अभियंते त्यांना दाद देत नाहीत. मुळात सेक्शन अभियंत्यांना फिल्डवर कामेच देऊ नये. मात्र तरीही ती दिली जातात. बांधकाम विभागातील सदावर्ते, जवादे व गिते यांच्या फिल्डवर्कमुळे गुत्तेदार पदाधिकाऱ्यांकडे बोंब मारतात. यातील काहींना तर आपल्या खासगी कामातून वेळ मिळत नाही. त्यामुळेच जिल्हाभर पेव्हर ब्लॉकचे कामेही वाढू लागली आहेत, तर या ठिकाणच्या काही कामचुकारांमुळे उपविभागातून चंदाले यांना जि. प.त पाचारण करावे लागले. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली तर तेही चुप्पी साधून आहेत. जि. प.त आधीच पदाधिकारी व सदस्यांचे धुमशान चालू असताना ही मंडळी काही आपला हेका सोडायला तयार नाही. त्यामुळे बांधकाम विभागाला आगामी काळ अवघड जाणार असल्याचे दिसत आहे.