हिंगोली : पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात पक्षनिरीक्षकास झालेल्या धक्काबुक्कीचा वाद आता पेटला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते विलास गोरे यांना पक्षातून निलंबित केले असून काँग्रेसच्या काही युवक पदाधिकाऱ्यांनी पक्षनिरीक्षक बाळासाहेब देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
हिंगोली जिल्हा काँग्रेसमध्ये आ.प्रज्ञा सातव व माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गटातील वादात समेट घडविण्याच्या प्रयत्नात निरीक्षक देशमुख यांनी आधी गोरेगावकर यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. पक्ष कार्यालयात कार्यकर्ते ताटकळत होते. नंतर गोरेगावकर समर्थकांसह कार्यकर्ते काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले. शाब्दीक चकमक उडाली. याचे खापर कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्यावर फोडून धक्काबुक्की केली. देशमुख यांनी या प्रकरणात विलास गोरे यांनी अश्लिल शिविगाळ केल्याचे सांगून पक्षश्रेष्ठींकडे दाद मागितली होती. यावरून गोरे यांना पुढील आदेशापर्यंत पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.
या पत्रानंतर आता काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांनीही प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवून देशमुख यांना प्रभारी पदावरून काढण्याची मागणी केली.निवेदनावर विठ्ठल जाधव, शेख जुबेर मामू, दीपकसिंह गहेरवार, अक्षय डाखोरे, संतोष साबळे, अजिम शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चूक एकाची, शिक्षा दुसऱ्यालाच – बोंढारे
काँग्रेसची अधिकृत बैठक पक्षनिरीक्षक बाळासाहेब देशमुख यांच्या सांगण्यावरूनच एनटीसी भागात घेण्यात आली. मात्र या बैठकीला हजर न राहता देशमुख यांनी माजी आ.गोरेगावकर यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या कार्यकर्त्यांनी अवमानकारक भाषा वापरल्याने वाद उद्भवला. खरेतर यात पक्षनिरीक्षक देशमुख यांच्यावरच कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र गोरे यांच्यावर झाली. हे चुकीचे असून प्रदेशाध्यक्षांकडे दाद मागितली जाईल, असे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी सांगितले.
...तर पक्षाशी असहकार
दिवंगत खा.राजीव सातव यांचे खंदे समर्थक विलास गोरे यांच्यावर केलेली कारवाई चुकीची आहे. पक्षाने त्यांना म्हणने मांडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे जोपर्यंत ही कारवाई मागे घेतली जात नाही. तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाही, असे पालिकेतील गटनेते शेख नेहाल यांनी म्हटले. यावेळी बापूराव बांगर, अनिल नेनवाणी, माबूद बागवान, मुजीब कुरेशी, आरेफ लाला, बासित मौलाना आदींची उपस्थिती होती.
जिल्हा कार्यालयाचे बॅनरही उतरले
एनटीसीत भाडे तत्त्वावर असलेले कार्यालय काँग्रेसमधील वादाचे साक्षीदार बनले होते. मात्र आता या कार्यालयावरील बॅनर हटल्याने पक्षाचे हे कार्यालय तर बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पंधरा दिवसांतच या कार्यालयाला ही वेगवेगळी स्थित्यंतरे पहायला मिळाली.