लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा: वसमत तालुक्यातील खांबाळा येथे रोजगार हमी योजनेतून विहीर घेण्याचा वाद ग्रामसभेत उफाळल्याने ग्रामस्थांना शिवीगाळ करून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार १७ सप्टेंबर रोजी उघडकीस आला. याप्रकरणी सरपंचासह त्यांच्या समर्थकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ७० ते ८० लोकांचा जत्था पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून होता. यात महिलांचाही समावेश होता.खांबाळा येथे १७ सप्टेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांना पाण्यासाठी रोजगार हमी योजनेतून विहीर करण्याचे ठरले होते. ही विहीर घेण्याच्या वादातून शाब्दिक चकमक झाली. यामध्ये महिलांसह ग्रामस्थांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याचा प्रकारही घडल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. या प्रकरणी सरपंचासह त्यांच्या समर्थकावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी महिलांसह ग्रामस्थांचा जत्था कुरूंदा पोलीस ठाण्यात आला होता. ठाण्यासमोर ठिय्या मांडून या प्रकरणी पोलीस डायरीत नोंद करण्यात आली होती; परंतु गुन्हा दाखल झाला नाही. या प्रकरणी सरपंच खंडेराव होडगीर यांना विचारले असता तसा काहीच प्रकार घडला नसून विहीर घेण्यावरून किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली, मारहाण व शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले.
खांबाळा येथे विहिरीच्या कामावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:34 PM