हिंगोली : कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. नागरिक नियम पाळत नसल्याने विळखा घट्ट होत असून रुग्ण मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहेत. रोज वाढणारे मृत्यूचे आकडे वाढत घेतल्याने कामाचा व्याप वाढला म्हणून की काय कलावंतरुपी यमराजच कोरोनापासून बचावासाठी जनजागृती करत असल्याचे चित्र आखाडा बाळापूर येथील बाजारपेठेत पहायला मिळत आहे.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पन्नासपेक्षा जास्त रुग्ण या भागात झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना सजग करण्यासाठी प्रशासनाने शक्कल लढविली. पदोपदी ऐकायला मिळणारे मृत्यूनंतर यमराज रेड्यावर बसून येवून घेवून जातो, हे चित्र डोळ्यासमोर उभे करून या कलावंतरुपी यमराजाकडून जनजागृती करून घेतली जात आहे.
हे यमराज बाजारपेठेत नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सामाजिक अंतराचा नियम पाळा, आजाराची लक्षणे दिसत असल्यास घाबरून न जाता लागलीच तपासणी करून घ्या. वेळेत उपचार केल्यास या आजारातून बरे होता येते, चांगल्या वैद्यकीय सुविधांनी आपल्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे आदी बाबतीत जागृती करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये बदल घडून येण्याची अपेक्षा आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाय केले जात असल्याने आता जनतेनेही गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. बाजारपेठेसह विविध ठिकाणी नाहक केली जाणारी गर्दी टाळणे आपल्याच हाती असताना अनेकजण ही बाब मनावर घेत नसल्याचे दिसते. आता यमराजामार्फतच दिलेला संदेश किती उपयोगी पडतो, हे आगामी काळात दिसणारच आहे.