हिंगोली जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी ७३ बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ४२२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे चिन्हवाटपाच्या दोन दिवसांनंतर डमी हाती पडताच उमेदवारांनी प्रचारकार्य जोमाने सुरू केल्याचे दिसत आहे. आपलेच पॅनल निवडून यावे यासाठी पॅनलप्रमुख कार्यकर्त्यांच्या मदतीने जोमाने कामाला लागले आहेत.
काही मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये तर सकाळी उठले की प्रचाराला लागत आहेत. त्यात प्रचाराचे साहित्य, बॅनर, पोस्टर आदींचा भरमसाठ वापर होत आहे. अशा मोठ्या ग्रामपंचायतींचा हा प्रचार विधानसभेला लाजवेल अशा पद्धतीने सुरू आहे. नेतेमंडळींचे बॅनर व पोस्टरवर छायाचित्रे टाकून जागोजागचे चाैक भरले आहेत. काहींनी तर आपल्या चिन्हाच्या प्रतिकृतीही बनवून मतदारांवर छाप पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विधानसभेसारखीच प्रचाराची रणधुमाळी दिसत आहे. हा प्रचार करताना कुठेही कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे दिसत आहे. सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर सुरू असल्याचे अभावानेच पहायला मिळत आहे.
आखाडा बाळापूर
येथे काँग्रेस व शिवसेनेच्या पॅनलमधील लढत रंगतदार होत आहे. प्रचारही जोरात आहे. कोरोनाचे नियम ढाब्यावर ठेवून शेकडो कार्यकर्ते एकाचवेळी प्रचारात उतरत आहेत. त्यावर कुणाचे नियंत्रणही नाही.
गोरेगाव
येथे घरोघर भेटींसह काॅर्नर बैठकांवर जोर आहे. महिला, पुरुष असे सर्वच यात सहभागी होत आहेत. कोरोनाच्या नियमांचा सर्वांना विसर पडला. तहानभूक हरवत विजयाची गणिते मांडत प्रचार सुरू आहे.
नर्सी नामदेव
येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरला आहे. कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरत आहेत. त्यांनी कोरोनाच्या नियमांना तिलांजली देत गृहभेटी चालविल्याने चिंता वाढत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कोरोनाचे नियम पाळूनच प्रचार करण्याच्या सूचना गावोगाव दिलेल्या आहेत. यावर कायम जनजागृती सुरू आहे. जमावबंदीही लागू असतेच. जर गाव पातळीवर कोरोनाचे नियम पाळले जात नसतील तर ते चुकीचे आहे. याबाबत पुन्हा सूचना निर्गमित केल्या जातील. सूचना पाळण्याचे पुन्हा एकदा आवाहन करीत आहोत.
-पांडुरंग माचेवाड, तहसीलदार, हिंगोली