हिंगोली: कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असले तरी जिल्ह्यात नागेली पानांच्या विक्रीत घट झाल्यामुळे पान विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
मार्च महिन्यात कोरोना आजाराचा शिरकाव सर्वत्र झाला. त्यामुळे मार्च ते सप्टेंबर ७ महिने पान विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवावी लागली. परिणामी पान विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आजमितीस जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी ग्रामीण भागातून येणारे पानांचे व्यापारी येईना झाले आहेत. कोरोना आजाराच्या आधी दिवसाकाठी चारशेर रुपये मिळायचे. परंतु, कोरोना आजारामुळे दिवसाकाठी दीडशे रुपयेही पदरात पडत नाहीत. त्यामुळे पान व्यवसाय डबघाईस आला आहे.
पिढ्यान्पिढ्या हा व्यवसाय चालत आल्यामुळे दुसरा व्यवसाय करणेही आता शक्य नाही. कोरोनाआधी महिन्याकाठी नागेली पानांची चाळीस हजारांच्या जवळपास विक्री व्हायची ती आता वीस हजारांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे. सद्य: स्थितीत महागाईने कळस गाठला आहे. बाहेरगावी जाणेही परवडत नाही. त्यात कोरोना आजारही अडसर ठरत आहे. चाळीस वर्षापूर्वी पानांना चांगली मागणी होती. त्या मानाने आता मागणी राहिलेली नाही. पानशौकिनही कमी झाले आहेत. आजमितीस सणावाराला पानांची थोडी बहुत विक्री होते. तसेच पान ठेलेवालेही थोड्या बहुमत प्रमाणात पान विकत घेऊन जातात. जिल्ह्यात कलकत्ता येथून कलकत्ता पानांची तर हुन्नर, विशाखा पट्टणम्, बिजवाडा, कर्नाटक, चाभरा येथून क्युरी पानांची आवक होते. शहरात जवळपास दहा दुकाने ही पान विक्रेत्यांची आहेत. कोरोनाचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाले नाही. शासनाचे सर्व नियम पाळून पान विक्री करावी लागत आहे. पान विक्री करतेवेळेस आम्ही स्वत: मास्क घालतो व ग्राहकांनाही मास्क घालून दोन फुटावरुन पान खरेदी करा असे सांगतो, असे पान विक्रेता सत्तार पहेलवान यांनी सांगितले.
शासनाकडून मदतीची अपेक्षापान विक्री व्यवसाय हा पिढ्याने पिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे. दुपारपर्यंत पान विक्री करुन नंतर उरलेल्या वेळात दुसरा व्यवसाय करुन घर संसार चालवतो. शासनाने पान विक्रेत्यांची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही शेख शौकत शेख तुराब, सत्तार पहेलवान यांनी केली.
कोरोना आजारामुळे पान खरेदी करणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. कोरोनाआधी ग्रामीण भागातूनही छोटे विक्रेते यायचे. परंतु, सध्या कोरोना संसर्गामुळे येईना झाले आहेत. सध्या कलकत्ता पान ४०० रुपयास १००, क्युरी पान ४० रुपयास १०० या प्रमाणे विक्री करतो; परंतु, सध्या म्हणावी तशी विक्री होत नाही. त्यामुळे घरखर्चही भागत नाही.-दीपक चौरशिया, पान विक्रेता