हिंगोली : कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोरोनाआधी एप्रिल व मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरक्षण होत होते. दीड ते दोन कोटी रुपये मिळायचे. परंतु, गत दीड वर्षांपासून १० हजार रुपयेही पदरात पडेना झाले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नाला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला आहे, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून सिकंदराबाद ते जयपूर, काचीगुडा ते नरखेड, तिरुपती ते अमरावती, हैदराबाद ते जयपूर, नांदेड ते गंगानगर या एक्स्प्रेस गाड्या सुरूच आहेत. कोरोनामुळे पॅसेंजर रेल्वे तर दीड वर्षापासून बंदच आहेत. केंद्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करत प्रवाशांसाठी सोयीसुविधा करण्यात येत आहेत. रेल्वेतून उतरलेल्या प्रत्येक प्रवाशाची अँटिजन तपासणीही स्थानकात केली जात आहे. जे प्रवासी प्रवासादरम्यान मास्क घालणार नाहीत, त्यांना दंडही लावण्यात येत असल्याचे स्टेशनमास्तर रामसिंग मीना यांनी सांगितले.
कोरोनामुळे प्रवासीसंख्या घटली...
कोरोना महामारीमुळे प्रवासीसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे काही रेल्वे बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. यामध्ये गंगानगर, कोल्हापूर, पुणे, यशवंतपूर, जम्मूतावी आदी रेल्वेचा समावेश आहे. कोरोना महामारी कमी झाल्यास बंद केलेल्या रेल्वे सुरू करण्यात येतील. प्रवासादरम्यान नियमांचे पालन प्रवाशांनी करावे. विनामास्क कोणीही प्रवास करू नये. तसेच सामाजिक अंतराचे भान ठेवावे.
-रामसिंग मीना, स्टेशनमास्तर, हिंगोली