हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना संशयित रूग्णांची संख्या दोन झाली आहे. ३० मार्च रोजी एक ५४ वर्षीय पुरूष कोवीड १९ केसचा क्लोझ कॉन्टॅक्ट असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर ३१ मार्च रोजी पुन्हा एका ४९ वर्षीय (पुरूष) संशयित रुग्णास जिल्हा रूग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे.
त्यामुळे हिंगोलीत आता संशयित रूग्णांची संख्या दोन झाली आहे. ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजता आयसोलेशन वार्डमध्ये भरती केलेला ४९ वर्षीय रूग्ण हा कोरोनाग्रस्त रूग्णाच्या संपर्कातील आहे. त्याची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे रूग्णात सद्यस्थितीला दिसून येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दोन्ही संशयित रूग्णांचे थ्रोट स्वॉब पुढील तपासणीसाठी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाºयांच्या टीममार्फत या दोघांवर औषधोपचार करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत होम क्वारंटाईन (घरातच अलगीकरण) मध्ये ठेवण्यात आलेले तिघे जण आहेत. त्यामध्ये २ मालदिव, १ कझाकिस्तानमधून हिंगोली येथे आले आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत तयार केलेल्या रॅपिड रेसपोन्स टिम व पोलीस प्रशासनामार्फत दर दिवशी पाठपुरावा करण्यात येत आहे.