हिंगोली : कोरोना महामारीची सध्या दुसरी लाट आहे. कोरोनाचे रुग्ण आजमितीस कमी प्रमाणात आढळून येत असले तरी जिल्ह्यातील सिद्धेश्वर व कवठा येथे कोविड सेंटरची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वांनाच सळो की पळो करुन सोडले आहे. काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. असे असले तरी नागरिकांनी बाजारात विनाकारण आणि विनामास्क फिरण्याचे टाळणे हे त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी फायद्याचेच आहे. कोरोनाआधी आसीयू बेडस् ६ होते, कोरोना नंतर बेड्स ४०, कोरोना आधी व्हेंटिलेटर ६ होते, कोरोनानंतर १३० आहेत, ऑक्सिजन कोरोना आधी १० जंबो सिलिंडर होते. कोरोना नंतर १,८०० जंबो सिलिंडर झाले आहेत.
शहर व ग्रामीण भागाकडे लक्ष...
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता दाट असते. तेव्हा नागरिकांना कोणत्याही आजाराची बाधा होऊ नये म्हणून दवाखान्याच्या सोयी-सुविधेत वाढ करण्यात आली आहे. नागरिकांनी आजार न लपविता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
सिद्धेश्वर व कवठा येेथे कोविड सेंटर
हिंगोली तालुक्यातील सिद्धेश्वर व सेनगाव तालुक्यातील कवठा येथे कोविड सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांना यामुळे त्या ठिकाणी सुविधा झाली आहे. ज्या ठिकाणी सुविधांची कमतरता आहे तेथील अहवाल शासनाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे.
सध्या कोरोना महामारीचे रुग्ण कमी झाले आहेत. दुसरीकडे नागरिकांना लसीकरणाबाबत आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील दवाखान्यात काही सुविधा राहिल्या आहेत का, याचीही व्यवस्था केली जात आहे. आरोग्याबाबतचा अहवाल शासनाकडे रोजच्या रोज पाठविला जात आहे.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली