हिंगोली: कोरोना विषाणूने बाधित होऊन राज्यातील नगरपालिका व नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत आहे. त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही. या कर्मचाऱ्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. १ मे पर्यंत नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
नगर पालिका, नगर पंचायतीमधील सफाई कामगार, पाणीपुरवठा मजूर व इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना दोन-दोन महिने वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कोरोना काळात त्यांची उपासमार होत आहे. याचबरोबर इतर मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. राज्यातील इतर आस्थापनामध्ये १५ टक्के उपस्थिती ठेवण्याची सूचना शासनाने दिली आहे. परंतु, अत्यावश्यक सेवा असे कारण सांगत नगरपरिषद, नगरपंचायतीची उपस्थिती शंभर टक्के ठेवून कोणतेही विमा संरक्षण न देता कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण व त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार समोर येत आहे.
३० एप्रिलपूर्वी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर निर्णय झाला नाही तर राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतमधील सर्व कर्मचारी १ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, उपाध्यक्ष धर्माजी खिल्लारे, रामेश्वर वाघमारे, दीपक रोडे, जयसिंग कचवाहा, अनुप खरारे, पी.बी. भातकुले, धनराज पिलवाह, प्रशांत नकवाल, संजय कुंभार, रत्नाकर अडशिरे, व्ही.टी. लहाने, गिरीश डुबेवार, सुभाष मोरे, हरिदास सोनुने, देवराम मुके, नीलेश सपकाळ, किशोर भावसार, किरण अहेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.