औंढा नागनाथ : येथे देशातील आठवे जोतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी कोरोना व्हारसच्या वाढत्या सावटामुळे भाविकांची गर्दी कमी झाली आहे. दरम्यान, मंदिर प्रशासनच्यावतीने स्वछता व खबरदारी घेण्याच्या सूचना अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिल्या आहेत
संपूर्ण देशामध्ये कोरंना व्हायरसने हाहाकार माजला आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक गर्दी होणाऱ्या ठिकाणी आता गर्दी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. औंढा नागनाथ देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी देश- विदेशातून भाविक येतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या सावटाचा परिणाम मंदिरां येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर जाणवत आहे. दररोज मंदिरामध्ये पाच ते दहा हजार भाविक दर्शन घेतात. परंतु कोरोना संकटामुळे आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांच्या संख्येत घट झाली आहे.
मंदिर प्रशासनाने व्हायरसबाबत काळजी घ्यावयाची सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. मंदिरातील गर्भगृह व मंदिर परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुरोहित, पुजारी व कर्मचारी यांना मास्क वापरण्याच्या सूचना मंदिर संस्थांचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी सूचना दिल्या आहेत. या भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरीही येणाऱ्या भाविकांमुळे धोका नाकारता येत नसल्याने ही उपाय योजना केल्याचे संस्थांनच्यावतीने सांगण्यात आले आहे.