हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व महत्वाच्या विविध शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. बुधवारी २५ मार्च रोजी कोरोना प्रादूर्भाव संदर्भात सर्वेक्षणासाठी कर्तव्यावरील आरोग्य सहाय्यीका प्रियंका साहेबराव राठोड कर्तव्य बजावून त्यांचे वडील पोलीस हवलदार साहेबराव राठोड यांच्यासोबत घरी जात होते. यावेळी वरील दोघांनीही शहरातील अग्रेसन चौकात पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती दिली होती, शिवाय तसा सोशल मिडियावर व्हीडीओही व्हायरल झाला होता. परंतु माझा गैरसमज दूर झाला, माझी कोणाबद्दलही तक्रार नाही, असे महिलेच्या वडिलांनी पोलिसांत जबाब दिल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे.
महिला कर्मचा-याचे वडील साहेबराव राठोड यांनी २६ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेत जबाब दिल्याचे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले. जबाबात राठोड यांनी सांगितले की, २६ मार्च रोजी मी व माझी मुलगी प्रियंका नांदेड नाक्यावरुन घरी जाताना कोरोना विषाणू संदर्भात बंदोबस्तातील सपोनि पुडंगे यांनी मला व माज्या मुलीला नांदेड नाका येथे थांबविले. तेंव्हा माझी मुलगी पोलीस मारतील या भीतीपोटी गाडीवरुन घाईगडबडीने खाली उतरत असतांना तिचा तोल जावून खाली पडली. व तिच्या डोक्याला मार लागला. तेंव्हा माझा असा गैरसमज झाला की, ड्युटीवरील सपोनि पुंडगे यांनी माझ्या मुलीला मारहाण केल्याने तिच्या डोक्याला दूखापत होवून ती बेशुध्द पडली. तेव्हा सपोनि पुंडगे यांनीच माझ्या मुलीला दवाखान्यात नेले.
तसेच रागाच्याभरात डॉ. झडपे यांच्या दवाखान्यात गेलो असता तेथे उपस्थिती काहींनी मला थांबवून काय प्रकार झाला याबाबत विचारणा केली. तेव्हा मी माझ्या मुलीला मार लागल्याच्या टेन्शनमध्ये असताना त्यांनी मला विचारपूस करीत मला काही एक समजू न देता माझी शुटींग केली. व सदर शुटींग व्हॉट्सअॅपवर व्हायरल केली. परंतू नंतर माझ्या मुलीकडून मला कळले की, ती गाडीवरुन उतरतांना खाली पडली व तिच्या डोक्याला जखम झाली. माझा सपोनि पुंडगे यांच्याबद्दल गैरसमज झाल्याने मी रागाच्या भरात पत्रकारासमोर बोललो व त्यांनी मला काही माहिती न होवू देता माझी शुटींग केली व व्हॉटसअॅपवर व्हायरल केली. त्याबाबत मला काही माहिती नव्हती. व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाहिल्यानंतर मला हा सर्व प्रकार समजला. सपोनि पुंडगे यांनी घडलेला सर्व प्रकार मला व्यवस्थीत सांगितल्याने माझा गैरसमज दूर झाला असून माझी तसेच माझी मुलगी प्रियंका राठोड आम्हा दोघांची सपोनी पुंडगे व इतर कोणांविरुध्द तक्रार नसून माझा गैरसमज दुरु झाला आहे. याप्रकाराबाबत मी दिलगीरी व्यक्त करतो. असा जबाब महिला आरोग्य कर्मचारी प्रियंका साहेबराव राठोड यांच्या वडीलांनी पोलीस विभागाकडे नोंदविला आहे. या घटनेची दखल जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी घेवून, या घटनेबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा करुन त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते.