हिंगोली : दुबई व पुणे मार्गे हिंगोलीत आलेल्या त्या दोन्ही संशयीत रूग्णांचे स्वॅब नमुने अखेर निगेटीव्ही आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयातून या दोघांनाही सुरक्षीततेच्या दृष्टिकोनातून जिल्हा रूग्णालयातील ‘आयसोलेशन वार्ड’ (कोरोना विषाणू बाधित रूग्णाकरीता) येथे १४ मार्चला सकाळी १० वाजल्यापासून उपचारखाली ठेवले होते.
हे दोघेही संशयीत फिजिशिएनच्या देखरेखीत होते. तज्ज्ञामार्फत दोघांचेही रिपोर्ट पुणे येथे पाठविण्यात आले, १६ मार्च रोजी दुपारी दोघांचेही स्वॅब नमुने निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. दोघांनाही आता रूग्णालयात लवकरच डिस्चार्ज केले जाणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
पुणे व दुबईतून आलेल्या दोघांनाही पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस खोकला असल्याने त्यांनी रूग्णालय गाठले होते. यावेळी सुरक्षीततेच्या दृष्टिकोनातून दोघांनाही जिल्हा रूग्णालयातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार उपचाराखाली ठेवले होते. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, स्वच्छता बाळगावी, बाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आवाहनही श्रीवास यांनी केले.