जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना महामारीने कहर केला आहे. कोरोनाने मृत झाल्यास त्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगर परिषदेला देण्यात आली. यासाठी नगर परिषदेने जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जवळपास १० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मार्च महिन्यापासून आजपर्यत २७ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता ज्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे त्यांना पीपीई किट, मास्क आदीं साहित्यांचे वाटप न. प. न. केले आहे.
एका वेळेस एकच पीपीई किट व मास्क वापरायचा असेही सूचित केले आहे. त्याप्रमाणे नियुक्त केलेले कर्मचारी हे पीपीई किट व मास्क घालूनच मृतांवर अंत्यसंस्कार करत आहेत. मार्च महिन्यापासून आजपर्यंत नगर परिषदेने अंत्यसंस्कारासाठी १ लाख ६५ हजार रुपये खर्च केला आहे. मुख्याधिकारी डाॅ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर हे नियुक्त केलेल्या दहा कर्मचाऱ्यांना स्मशानभूमीच्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परवानगीही दिली जात नाही. कोरोनापासून संरक्षण व्हावे म्हणून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची नगर परिषदेच्या वतीने काळजी घेतली जात आहे. जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त होणाऱ्यावर मृतांवरच न. प. कडून अंत्यसंस्कार केले जात आहेत.
कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम नगर पालिकेचे कर्मचारी चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. त्यांना अंत्यसंस्काराच्यावेळी नगर परिषदेच्या वतीने पीपीई किट, मास्क दिल्या जातात.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक
शासनाने नगर परिषदेकडे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जिम्मेदारी सोपविण्यात आली आहे. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दहा जणांची टीम तयार केली आहे.
- डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी
मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दहा लोकांची टीम केली आहे. अंत्यसंस्काराच्यावेळी नियुक्त केेलेल्या कर्मचाऱ्यांची नगर परिषदेच्या वतीने काळजी घेतली जाते.
- बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक