हिंगोली : जिल्हा रूग्णालयाकडे १६ जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील सहा जणांना सारीचा आजारामुळे उपचार सुरू होते. तर इतर पाच जण हे बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. या सर्वांचे थ्रॉट स्वॅब १६ जुलै रोजी पॉझिटिव्ह आले आहेत.
हिंगोली शहरातील पोस्ट आॅफिस कार्यालया जवळील एका ७७ वर्षीय वृद्धाला बाधा झाली आहे. तसेच कासारवाडा ६५ वर्षीय पुरूष, आझम कॉलनी ५८ वर्षीय पुरूषास कोरोनाची लागण झाली आहे. तर वसमत येथील ब्राम्हण गल्लीतील एक ४५ वर्षीय पुरूष, गुलशन नगरातील ३२ वर्षीय महिला, जुनापेठमधील ६३ वर्षीय पुरूषास बाधा झाली आहे. सम्राट कॉलनीतील कोरोना रूग्णाच्या संपर्कातील एका चाळीस वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
तसेच वसमत स्टेशनरोड येथील १५ वर्षीय बालकास कोरोनाची लागण झाली आहे. तर बाधित रूग्णाच्या संपर्कातील हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील तीन महिलांचेही आज अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण ११ जणांचे आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३७३ बाधित रूग्णसंख्या असून यापैकी २९२ रूग्ण बरे झाले आहेत. तर ८१ रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.