हिंगोली : वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती असलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या सर्वांचे अहवाल १७ मे रोजी पोझीटीव्ह आले आहेत. आठही रूग्ण मुंबई येथून वसमत तालुक्यात परतल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या सर्वांना कोव्हीडची लागण झाल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात एकूण १५ रूग्ण पोझीटीव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हिंगोली जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल सुरू असतानाच आता पुन्हा बाधित रूग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ रूग्ण पोझीटीव्ह होते. त्यात आता पुन्हा ८ जणांची भर पडल्याने हिंगोली जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ९९ झाली आहे. यापैकी ८४ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर्वीचे ७ आणि आजचे ८ एकूण १५ बाधित रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.