हिंगोली : १ मे रोजी एकाच दिवशी २६ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा ५ जवानांसह अन्य एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या ५३ वर पोहोचली आहे.
१ मे रोजी हिंगोली एसआरपीएफमधील एकूण २६ जवान एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पुन्हा धक्का बसला. एकूण ६ जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी ५ जण हिंगोली एसआरपीएफचे जवान आहेत. तर सेनगाव तालुक्यातील जांभरुण रोडगे येथील कोरोनाग्रस्त बालकाच्या संपर्कातील एक जण पॉझिटिव्ह आला आहे. ४८ वर्षे वयाची ही व्यक्ती आहे. आता एकूण ४७ एसआरपीएफ जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील एकजण जालना एसआरपीचा आहे. यापैकी ३४ जवान मालेगाव येथे तर १३ जण मुंबईत सेवा बजावून परतलेले आहेत. यापैकी ४ जवनांना रक्तदाब, मधुमेह आदींचा त्रास असल्याने खबरदारी म्हणून औरंगाबाद येथे हलविले आहे.
याशिवाय जालना येथील जवानाच्या संपर्कातील दोघे व वसमत येथील एक युवकही कोरोनाबाधित आहे. त्यामुळे दाखल ५२ जणांवर उपचार सुरू असून एकजण यापूर्वीच कोरोनामुक्त झालेला आहे. जे दाखल आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे जिल्हा शल्यचिकीत्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.