हिंगोली: दोन दिवसांपूर्वी मुंबई व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पोलीस बंदोबस्त करून परतलेल्या हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या जवानांतील सहा जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे जवान वास्तव्याला एकाच इमारतीत असल्याने आणखी किती जणांना संसर्ग झाला, हेही तपासावे लागणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे यापूर्वी एक कोरोनाचा रुग्ण आढळला होता. तो बरा होवून घरी परतला असताना राज्य राखीव दलाचे सहा जवान कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जेथे परिस्थिती हाताबाहेर जात आहे, अशा ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले होते. तेथे ठरावीक दिवसाची सेवा केल्यानंतर त्यांना परत त्यांच्या दलात पाठविले आहे. दोन दिवसांपूर्वी ही मंडळी दाखल झाली होती.
कोरोनाच्या रेड झोनमध्ये काम करून परतलेल्या या जवानांना क्वारंटाईन करण्यासाठी इमारतीचा प्रश्न असल्याने त्यांच्याच कॅम्पस्मध्ये एका इमारतीत ठेवले आहे. अपुऱ्या व्यवस्थेमुळे यातील बहुतांश जण एकत्रित आहेत. त्यामुळे या सहा जणांनाच कोरोना झाला की, अजून काहीजण आहेत? याची चाचपणी होणे गरजेचे आहे. कोरोनाचे पॉझिटिव्ह आलेल्या सर्वच जवानांची प्रकृती स्थिर असून चिंतेची बाब नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी रात्री उशिरा या जवानांचे थ्रोट स्वॅब अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाले आहेत. या ठिकाणी असलेल्या १९२ जणांपैकी ९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सहा पॉझिटिव्ह आहेत. ९३ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने प्रलंबित आहेत. यात आढळलेल्या या रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशनमध्ये दाखल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर आता प्रशासन पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५0६ जण आयसोलेशन व क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी २८0 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. सध्या या सहा सेंटर्समध्ये ४१७ जण दाखल आहेत.