हिंगोली : काल रात्री उशिरा आणखी तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता एकूण बाधितांची संख्या 251 वर पोहोचली आहे तर काल पाच जण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या 229 एवढी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये एक जण तलाबकट्टा भागातील रहिवासी युवक आहे. तो लातूर जिल्ह्यातील निलंगा येथून परतला होता. तर अन्य दोन महिला रिसाला भागातील असून त्या मुंबईहून परतल्या आहेत. काल बरे झालेल्यांमध्ये सेनगाव तालुक्यातील भगवतीचे तीन वसमत तालुक्यातील मुरुंबा येथील एक तर औरंगाबाद येथे दाखल असलेला एसआरपीएफ जवानाचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.