जवळा बाजार (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथे एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्या संपर्कातील सात जणांना क्वारंटाईन करण्यासाठी पथक गावात गेले असता त्यांनी क्वारंटाईन होण्यास नकार दिल्याने मंगळवारी ७ जणांविरुद्ध हट्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजनवाडी येथील एका युवकास कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे. त्याला हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचा संपर्कातील सात जणांना क्वारंटाईन करण्यासाठी पथकातील अधिकारी व कर्मचारी अंजनवाडी गावात गेले होते. यावेळी या सात जणांनी क्वारंटाईन होण्यास नकार दिला.
यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशचे उल्लंघन केले गावात वास्तव्य करून संसर्ग होण्याची शक्यता इतरांच्या आरोग्य व जीवितास धोका निर्माण केल्यामुळे अंजनवाडी ग्रामसेवक योगेश इपकलवार यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजेश ठाकूर तपास करीत आहेत.