औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील जलालपूर येथे शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४.३0 च्या सुमारास घडली. या दोघांचेही मृतदेह शेततळे जेसीबीने फोडून बाहेर काढले.
सध्या कोरोनाच्या लॉकडाऊन असल्याने अनेकांनी आपला मोर्चा शेताकडे वळविला आहे. परभणी येथून महाविद्यालयीन तरुण मित्रांनीही जलालपूर येथील सतीश उदास या मित्राच्या शेतात जाण्याचा बेत आखला. परभणीहून नांदखेडा, सनपुरी, धारणगाव, साडेगाव, उखळीमार्गे ते जलालपूर येथे आले. दुपारी बाराच्या सुमारास ही मंडळी शेतात दाखल झाली. त्यानंतर शेतात खान-पान झाल्यावर सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास सतीश हा काका बाळू उदास यांच्या शेतातील एका शेततळ्यावर सर्वांना घेवून गेला. मात्र पोहायला येत नसतानाही सतीश लक्ष्मणराव उदास (वय २0, जलालपूर) व ॠषिकेश पांडुरंग भराड (वय २0, नांदखेडा, ता.परभणी) हे शेततळ्यात उतरले. इतरांनी त्यांना सांगितल्यावर खोल पाण्यात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शेततळ्यात १५ ते १६ फुट खोल पाणी होते. इतर सहा ते सात जण बाहेर शेततळ्याच्या बांधावर उभे होते. हे दोघे बुडायला लागल्याने एकाने पोहणे येत असल्याने उडी मारून त्यांना वाचवायचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश आले नाही. आरडाओरड करुन त्यांनी इतरांना जमविले. सव्वापाचच्या सुमारास जेसीबीने शेततळे फोडून या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. सहा वाजेपर्यंत औंढा नागनाथ पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. पंचनामा करून पुढील प्रक्रिया करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीमाबंदी असली तरीही काही राज्य रस्त्यांवर पोलीस नसल्याने अनेकजण अशा खुष्कीच्या मार्गाने फिरताना दिसत आहेत. त्यातूनच ही मंडळी परभणीहून जलालपूरपर्यंत आली. त्यानंतर ही दुर्घटना घडली. यामुळे या गावात शोककळा पसरली आहे.