हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा नियोजन करीत असून विविध उपाययोजना करत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार ठरवून दिलेल्या वेळेत भाजीपाला, व फळविक्री तसेच किराणा साहित्य खरेदीसाठी १० एप्रिल रोजी मुभा देण्यात आली होती. परंतु यावेळी सोशल डिस्टन्स पाळले गेले नाही. त्यामुळे नागरिकांनी हम नही सुधरेंगे जणू असा काही संदेश दिल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. लोकांची गर्दी अन् नागरिकांनी सोशल डिस्टन्सला तिलांजली यामुळे मात्र प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे.
जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात किराणा, भाजीपाला, फळविक्रीसाठी मुभा देण्यात आली होती. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवूनच खरेदी करावी असा संदेशही जिल्हा प्रशासनाने दिला होता. विशेष म्हणजे हिंगोली शहरातील मुख्य पाच ठिकाणी यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. या पाचही ठिकाणी जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार न. प. चे मुख्याधिकारी रामदास पाटील आणि हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अखिल सय्यद यांनी नियोजन करून आखणीही केली होती. तसेच भाजी-फळ विक्रेते, किराणा मेडिकल आदींनी ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, विक्रेत्यांनी स्वत: मास्क, तोंडाला बांधवा अन्यथा दंड ठोठावला जाईल असा कडक इशाराही दिला होता. परंतु अनेक ठिकाणी आदेशाची पायमल्ली होताना दिसून आली.
नागरिकांनी सोशल डिस्टन्स तर पाळले नव्हतेच, शिवाय अनेकांच्या तोंडांना रूमाल किंवा मास्कही दिसून आले नाहीत. त्यामुळे नागरिक कोरोना सारख्या आजाराला गंभीरतेने का घेत नसावे असा प्रश्न निर्माण होत असून प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. १० एप्रिलला जिल्हाभरात ठिकठिकाणी भाजीपाला, किराणा साहित्य खरेदी करण्साठी सर्वत्र गर्दी जमली होती. यावेळी अनेकांनी नियम पाळल्याचेही दिसून आले. परंतु काही नागरिकांनी कुठलीच दक्षता घेतली नव्हती.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचीच पायमल्ली होताना दिसून येत आहे. ही गंभीर बाब असून यामुळे अनेक प्रशासकीय अधिकाºयांनी खंत व्यक्त केली आहे. हिंगोली शहरातील मोकळ्या जागेत पाच ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी आला होता. परंतु यापूर्वीच भाजीविक्रेत्यांना नियमावली घालून देण्यात आली होती. सोशल डिस्टन्सचे नियम प्रत्येकांनीच पाळावे असे आवाहनही करण्यात आले होते.
विशेष म्हणजे भाजीपाला खरेदीसाठी येताना नागरिकांनी कुठलेच वाहन घेऊन येऊ नये, खरेदीसाठी पायीच यावे असे सांगूनही शहरात मात्र वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने घेऊन येणाºयांवर थेट गुन्हे दाखल केले जातील तसेच वाहन जप्त करून दंड ठोठाण्याचे आदेश होते. परंतु शहरातील पाचही ठिकाणी मात्र ठिकठिकाणी वाहनांची वर्दळ दिसून आली.