हिंगोली : औंढा तालुक्यातील उखळी येथील एका तरुणीचा ताप, उलट्या व श्वसनाच्या त्रासाने परभणी येथील रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांसह अन्य दोघांना खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. येथे एका कोरोनाग्रस्तावर उपचार सुरू असून काल दाखल झालेल्या एका संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांसह संपर्कातील व्यक्तींना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल केल्यामुळे येथील संशयितांचा आकडा वाढला आहे. त्यातील ९ जण अजूनही वसमत येथील शासकीय क्वारंटाईन केंद्रात आहेत. त्यानंतर श्वसनाच्या त्रासामुळेही काही संशयित दाखल झाले होते. मात्र त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
काल रात्री औंढा तालुक्यातील उखळी येथील एका कुटुंबातील तरुण मुलीचा ताप, उलट्या व श्वसनाच्या आजाराने परभणी येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तिचे शवविच्छेदन केले. मात्र थ्रोट स्वॅब घेतलेला नव्हता. मात्र खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने या मुलीच्या कुटुंबियांसह तिला परभणी येथे नेण्यासाठी मदत करणाºया अन्य दोघांना हिंगोली येथील विलगीकरण कक्षात दाखल केले. या आठही जणांचे थ्रोट स्वॅब घेतले असून ते औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या मुलीला आजारी पडल्यानंतर तीव्र श्वसन त्रास जाणवत असल्याचे व मधुमेहही असल्याचेही सांगितले जात आहे. त्यातच तिचा मृत्यूही झाला. त्यामुळे आता यातील संशयितांचे अहवाल आल्यानंतरच नेमके काय ते स्पष्ट होणार आहे. मात्र या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.