हिंगोली: जिल्ह्यात परजिल्ह्यातून गावाकडे परतलेल्या 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास आरोग्य विभागात हे अहवाल प्राप्त झाले आहेत. आता जिल्ह्याची रुग्णसंख्या 159 वर गेली असून 90 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. तर 69 रुग्ण उपचार घेत आहेत.
काल एकाच दिवशी तब्बल पन्नास रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात तब्बल 13 ठिकाणी एकाचवेळी कंटेनमेंट झोन जाहीर झाले आहेत. आज सायंकाळी काहीजणांचे रिपोर्ट निगेटिव आल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र रात्री साडेअकराच्या सुमारास कळमनुरी कोरोना केअर सेंटरमधील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यातील चार जण मुंबई, तीन जण रायगड, तर एक जण पुण्यावरून आलेला आहे. हे सर्वजण कळमनुरी तालुक्यातील आहेत. घोडा कामठा येथील एक, येडशी तांडा येथील 2, आडा येथील एक, कांडली येथील एक तर चाफनाथ येथील तीन जण आहेत. कळमनुरी तालुक्यात आतापर्यंत एकही रुग्ण नव्हता. नांदेड येथे आखाडा बाळापुर येथील एक चालक पॉझिटिव आढळला होता. मात्र त्याची नोंद नांदेड जिल्ह्यात झाली होती.