हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला पोझीटीव्ह रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. सदर रूग्ण हा कोरोनामुक्त झाला असून त्यास १७ एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयाच्यातर्फे डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी आयसोलेशन वार्डातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचा-यांनी भावूक होऊन ‘हम होंगे कामयाब, एक दिन’ गीत सादर केले आणि कोरोनामुक्त रूग्णास आनंदाने निरोप दिला.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूशी डॉक्टर, परिचारिका आणि सफाई कामगार लढा देत आहेत. हिंगोली येथील जिल्हा रूगणालयातील आयसोलेशन वार्डात कोरोना विषाणूचा पॉझिटीव्ह रुग्ण दाखल होताच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. सदर रुग्णास ३१ मार्च रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. २ एप्रिल २०२० रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. होता. एकूण १४ दिवस या रूग्णावर जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार केले.
रुग्णालयातील डॉक्टर्सच्या पथकाच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. सदर रुग्णाची प्रकृती १४ दिवस स्थिर होती. केंद्रीय मंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे २४ तासांच्या अंतरावर सदर रुग्णाचे दोन्ही थ्रॉट स्वॅब नमुने आता निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता तो कोरोनामुक्त झाला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. यावेळी जिल्हा रूग्णालयातील सर्व स्टाफचे अधिकारी व कर्मचा-यांनी सोशल डिस्टन्स ठेवून रूग्णास पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. हिंगोली जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि परिचारिका या सर्वांच्या परिश्रमाने अखेर कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले होते. तसेच खबरदारी म्हणून रुग्णाच्या संपर्कातील ११ जणांना आयसोलेशन वार्डात दाखल करून उपचार करण्यात आले होते. या सर्वांचेच थ्रॉट स्वॅब नमुने निगेटीव्ह आले होते.
सदर रुग्णाच्या राहत असलेल्या परिसरात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली कंन्टेमेन्ट आणि बफरझोन प्रक्रिया राबविण्यात आली. ६१ पथके तैनात करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. अजूनही सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरूच आहे.