हिंगोली,:- हिंगोलीमध्ये 1 मे रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात आणखी एका एसआरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आज एकाच दिवसात हिंगोलीत 26 रुग्ण वाढले आहेत.
मुंबई व मालेगाव येथील बंदोबस्तावरून 19 व 20 एप्रिल रोजी हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील 194 जवान व अधिकारी जिल्ह्यात परत आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाला आज सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार 25 एसआरपीएफ जवान कोरोना बाधित झाले असून सायंकाळी आणखी एक जवान कोरोनाग्रस्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे रुग्णांची संख्या 47 इतकी झाली असून एका रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या 47 रुग्णात 42 जण एसआरपी जवान आहेत. तर एक जालना येथील एसआरपी जवान असून त्याच्या संपर्कातील दोघे तर वसमत व सेनगाव चा प्रत्येकी एक जण आहे. तर हिंगोलीच्या चार जवानांना मधुमेह, उच्चरक्तदाब आदी त्रास असल्याने औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
प्रशासनाची निष्काळजी भोवली
या सर्व प्रकारात जिल्हा प्रशासन व एसआरपी प्रशासनाने कोरंटाईन केलेल्या जवानांना सुरुवातीला एका खोलीत तीन ते चार जण ठेवल्याने गोंधळ झाला. त्यामुळे बाधित व बाधित नसलेले एकत्र राहिले. आताही या रुग्णांना स्वतंत्र खोली दिल्याचे सांगितले जात आहे त्यांना शौचालय व इतर सुविधा मात्र एकत्रितपणे वापरायला लागत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अजून रुग्ण वाढण्याची भीती जवानांमधूनच व्यक्त केली जात आहे. याशिवाय या जवानांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही सुमार असल्याचे सांगितले जात आहे प्रशासन या जवानांना वाळीत टाकल्या प्रमाणे वागवत असल्याने संतापाची लाट आहे. हे जवान रेड झोन मध्ये कर्तव्य म्हणून सेवा बजावण्यासाठी गेले होते, मात्र आता त्यांच्याकडे अपराध्यासारखे पाहिले जात आहे.
आरोग्य यंत्रणेकडून तपासणी नाहीआरोग्य यंत्रणा या जवानांना सूचना देण्यासाठी कधीच कोरंटाईन सेंटरमध्ये जात नाही. इतरही ठिकाणी असाच उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. शिवाय किती रुग्ण पॉझिटिव्ह आहेत याची माहिती नावासह बाहेर येण्याची प्रकारही अजून सुरूच आहेत. प्रशासन याबाबत कधी गंभीर होईल, हे कळायला मार्ग नाही.