हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर आणखी चार संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. यात कझाकिस्तानमधून आलेल्या एकासह त्याचा भाऊ, एक ११ वर्षीय मुलगी व अन्य एक दिल्ली येथील मरकज कनेक्शन असल्यामुळे दाखल केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळून आला आहे. ३१ रोजी या रुग्णास कारोनाग्रस्ताचा क्लोज कॉन्टॅक्ट म्हणून दाखल केले होते. त्याची प्रकृती स्थिर असून स्वॅब चाचणीनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १ एप्रिल रोजी एका ११ वर्षाच्या मुलीस आयसोलेशनमध्ये दाखल केले असून तिला कारोना संसर्गाची लक्षणे आहेत. तिचा थ्रोट स्वॅब नमुना औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविला. १ एप्रिल रोजी रात्री कझाकिस्तानवरून आलेल्या आणि होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या एकासह त्याच्या भावाला रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून स्वॅब चाचणीसाठी औरंगाबादला पाठविले आहेत.
पाचवा रुग्ण आज पहाटे पाचच्या सुमारास कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील औंढा येथील एकजण दाखल केला आहे. या रुग्णाचे दिल्ली येथील मरकज कनेक्शन असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या रुग्णाचाही स्वॅब पाठविला आहे. १ एप्रिलला दाखल झालेल्या सर्वांचे स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे सध्या पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या कोणी क्लोज कॉन्टॅक्ट आहे काय? याचा शोध घेतला जात आहे.