हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला असून आज पुन्हा दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आता एकूण मृत्यू पाच झाले आहेत. तर पाच जणांचा जिल्ह्याबाहेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीनच दिवसांत जिल्ह्याचे चित्रच पालटले आहे. कोरोनाची आजपर्यंतची रुग्णसंख्या ४४0 एवढी आहे. तर यापैकी ३२३ जण बरे झाले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात सुरुवातीच्या दोन महिन्यांत परजिल्ह्यातून अथवा राज्यातून आलेल्यांनाच कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर येत होते. मात्र टाळेबंदी उठल्यानंतर इतर जिल्ह्यात जावून येण्याचे प्रमाण वाढल्यानंतर विविध भागात रुग्ण आढळले. त्यांच्या संपर्कातील लोकांमुळे मागील दीड महिन्यांत दोनशे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. तर मागील तीन दिवसांत तब्बल पाच जण कोरोनाने दगावले आहेत.
आज दगावलेले दोन्ही रुग्ण हिंगोली शहरातील आहेत. यातील एक ३५ वर्षीय युवकास सारीच्या आजाराने चिंताजनक प्रकृती असताना भरती केले होते. तो कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्याचा मृत्यू झाला. तर मंगळवारा येथील ५५ वर्षीय वृद्धालाही सारीसदृश्य लक्षणे असल्याने दाखल केल्यानंतर काल कोरोना असल्याचे स्पष्ट झाले होते. आज या रुग्णाचाही मृत्यू झाला आहे.
हिंगोलीत आतापर्यंत आढळलेल्या ४४0 पैकी ३२३ रुग्ण बरे झाले असून ११४ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा १० वर पोहोचला असला तरीही यातील पाच जण परजिल्ह्यात उपचारार्थ गेल्यावर दगावले आहेत.